विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच... राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या...

Share:
Main Image
Last updated: 09-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ९ जुलै - राज्याचे पावसाळी विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच, राज्य सरकारने प्रशासकीय व्यवस्थेला गती देण्यासाठी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील ८ वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश ८ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आले असून, यात काही महत्त्वाच्या महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक आणि महानगरपालिका आयुक्तांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांची 'बदल्यांची परंपरा' कायम
फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून कॅबिनेट बैठकीच्या दिवशी किंवा आसपास आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्याची परंपरा या आठवड्यातही कायम राहिली आहे. आगामी काळातील प्रशासकीय आव्हाने आणि विविध विभागांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी हे फेरबदल करण्यात आल्याचे समजते.

 कोणाची कुठे झाली बदली?
राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार खालील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत:

१. रुपेश जयवंशी (IAS:२००९): पुणे येथील 'महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे' व्यवस्थापकीय संचालक रुपेश जयवंशी यांची मुंबईतील 'महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या' व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

२. श्रीधर दुबे (IAS:२०१४): यापूर्वी १९ मे २०२६ रोजी काढलेल्या बदली आदेशात अंशतः बदल करून, आता त्यांची नवी मुंबई येथील 'राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान' (NRLM) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे.

Advertisement

३. निलेश सागर (IAS:२०१५): नवी मुंबईच्या 'NRLM' चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची आता पुणे येथील 'आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या' आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

४. जगदीश मिनीयार (IAS:२०१५): पुण्याचे महिला व बालकल्याण आयुक्त जगदीश मिनीयार यांची छत्रपती संभाजीनगर येथे सिडकोचे (CIDCO) मुख्य प्रशासक (नवीन शहरे) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

५. वर्षा लड्डा (IAS:२०१५): अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांची पुण्याच्या महिला व बालकल्याण आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

६. डॉ. मंगेश गोंदवले (IAS:२०१५): २३ जून २०२६ च्या आदेशात बदल करून, डॉ. मंगेश गोंदवले यांची आता अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.

७. पंकज देवरे (IAS:२०१६): मुंबईतील 'महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे' सचिव पंकज देवरे यांची एमएमआरडीए (MMRDA) मुंबई येथे 'सह महानगर आयुक्त' या अत्यंत महत्त्वाच्या पदावर बदली झाली आहे.

८. डॉ. मंजिरी मानोलकर (IAS:२०१६): पुण्याच्या 'आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या' आयुक्त डॉ. मंजिरी मानोलकर यांची पुणे येथील 'महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या' व्यवस्थापकीय संचालकपदी (MD) वर्णी लागली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.