एस.के. खेडकर, (नाशिक) ८ जुलै - नाशिक शहरात प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी 'परिक्रमा मार्ग' (रिंग रोड) प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेने वेग घेतला आहे. या अंतर्गत मौजे वरवंडी (ता. दिंडोरी) येथील गट क्रमांक ९७/२ मधील ०.२१ हेक्टर आर क्षेत्राची खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविली जात आहे.
जाधव कुटुंबातील १९ सदस्यांच्या संमतीने खरेदी पूर्ण
मौजे वरवंडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर सिताराम जाधव, सरस्वती सिताराम जाधव, प्रकाश सिताराम जाधव, शरद सीताराम जाधव, मंदाकिनी बाळासाहेब ताजणपुरे, शुभम साहेबराव जाधव, मयुरी साहेबराव जाधव तसेच वंदना साहेबराव जाधव यांच्या एकत्रित कुटुंबाच्या मालकीची ही जमीन होती.
या ०.२१ हेक्टर जमिनीची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जाधव कुटुंबातील एकूण १९ सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होते. या सर्व सदस्यांच्या संमतीने आणि प्रशासनाला केलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे ही खरेदी कायदेशीररीत्या पार पडली. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने कार्यकारी अभियंता संदीप पांडागळे व अॅड. स्वप्नील मोरे यांनी ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा
शासनाच्या या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादनास सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाधव कुटुंबाचे विशेष अभिनंदन केले. शेतकरी आणि जमीनधारकांच्या अशाच सकारात्मक सहकार्यामुळे प्रकल्पाच्या कामाला मोठी गती मिळत आहे. आगामी 'सिंहस्थ कुंभमेळा-२०२७' च्या अनुषंगाने नाशिक शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उभारण्यासाठी हा परिक्रमा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.