रोटरी नाईन हिल्सच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा... येथे होणार दिमाखदार पदग्रहण सोहळा...

Share:
Main Image
Last updated: 08-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ जुलै - रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्सच्या अध्यक्षपदी वर्ष २०२६-२७ साठी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रोटेरियन अभय नेरकर यांची, तर सचिवपदी रोटे. हर्षद बेळे व रोटे. अभिषेक व्यास आणि कोषाध्यक्ष म्हणून रोटे. धीरेंद्र वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा गुरुवार (दि. ९ जुलै) रोजी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.

क्लबचे मार्गदर्शक व मुख्य सल्लागार रोटे. धनंजय बेळे आणि क्लबच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० सह नाशिकच्या सामाजिक व औद्योगिक वर्तुळातून जोरदार स्वागत होत आहे.

अनुभवी व सक्षम नेतृत्वाकडे धुरा

नूतन अध्यक्ष रोटे. अभय नेरकर हे 'नेरकर प्रॉपर्टीज' या नाशिकमधील नामांकित बांधकाम व विकासक संस्थेचे संचालक आहेत. भव्य दिव्य बांधकाम आणि मोठ्या भूखंडांच्या विकासात (डेव्हलपमेंट) त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. गेल्या आठ वर्षांपासून ते रोटरी क्लबशी जोडलेले असून, त्यांनी विविध पदांवर काम केल्यामुळे त्यांच्या पाठीशी दांडगा अनुभव आहे.

हा माझा बहुमान; समाजोपयोगी कामांसाठी सर्वस्व पणाला लावू: अभय नेरकर

"रोटरी ही २२० हून अधिक देशांत कार्यरत असलेली जागतिक पातळीवरील अग्रगण्य संस्था आहे. पोलिओ निर्मूलनासह अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवाहात आणणे, गावे दत्तक घेणे, स्वच्छतागृहांची उभारणी व शाळांचे बांधकाम यात रोटरी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. अशा प्रतिष्ठित संघटनेचे अध्यक्षपद मिळणे हा माझा बहुमान आहे. माझ्या कारकिर्दीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून रोटरीचे नाव अधिक उज्ज्वल करण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावू," अशी प्रतिक्रिया रोटे. अभय नेरकर यांनी व्यक्त केली.

Advertisement

नूतन कार्यकारिणीत दिग्गजांचा समावेश

सचिव - रोटे. हर्षद बेळे: उच्चशिक्षित माजी सनदी अधिकारी असलेले हर्षद बेळे यांचा अंबड औद्योगिक वसाहतीत कोर्टा केबिन आणि रेडीमेड फार्म हाऊसचा मोठा उद्योग आहे. देशात व परदेशात मल्टिनॅशनल कंपन्या आणि शासकीय संस्थांमध्ये त्यांची मोठी कामे सुरू आहेत. त्यांनी 'आयमा' (AIMA) व 'निमा' (NIMA) या औद्योगिक संस्थांमध्येही राज्य व राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

सहसचिव - रोटे. अभिषेक व्यास: खेळणी व अ‍ॅम्युझमेंट पार्क उभारणी क्षेत्रातील नामांकित उद्योजक असून, त्यांनी विविध सामाजिक व औद्योगिक संस्थांवर अनेक पदे भूषवत सक्रिय योगदान दिले आहे.

कोषाध्यक्ष - रोटे. धीरेंद्र वाघ: प्रसिद्ध शासकीय कंत्राटदार असून, इलेक्ट्रिकल, जलसंधारण आणि बांधकाम क्षेत्रात त्यांची मोठी कामे आहेत. मुंबई आणि नाशिक येथे असताना त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी विशेष कार्य केले असून, त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. क्लबच्या स्थापनेपासून त्या रोटरीशी जोडलेल्या असून नेहमीच अग्रेसर असतात.

परंपरेचा वारसा पुढे नेणार

रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्स नाशिकच्या अध्यक्षपदाची धुरा यापूर्वी विराज गडकरी, प्रेरणा बेळे, विजय जोशी, कल्पना शिंपी, प्रकाश ब्राह्मणकर, वैभव चावक, धनंजय बेळे आदी दिग्गजांनी यशस्वीपणे भूषवली आहे. हाच समृद्ध वारसा पुढे नेत नूतन कार्यकारिणी सामाजिक बांधिलकीच्या नव्या उंचीवर क्लबला नेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.