नाशिक, (प्रतिनिधी) ८ जुलै - सिन्नर-शिर्डी महामार्गावरील भोकणी शिवार भागात 'छोटा हत्ती' या मालवाहू वाहनाच्या चालकाला अडवून, त्याच्या डोक्यात वजनी वस्तूने वार करत सव्वा लाखाचा ऐवज लुटणाऱ्या मुख्य संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वावी पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून, अटक केलेल्या संशयिताच्या फरार साथीदाराचा शोध आता युद्धपातळीवर सुरू आहे. मच्छींद्र खंडू सानप (वय ३३, रा. भोकणी, ता. सिन्नर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी चालक चंद्रकांत कारभारी उगले (वय ३९, रा. मापारवाडी, सिन्नर) यांनी वावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
वाहन अडवून केला जीवघेणा हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत उगले हे मालवाहू 'छोटा हत्ती' वाहनावर चालक म्हणून काम करतात. गेल्या शनिवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास ते सिन्नर-शिर्डी मार्गावरून प्रवास करत होते. दरम्यान, भोकणी ते देवपूर फाटा या दरम्यान संशयित मच्छींद्र सानप आणि त्याच्या साथीदाराने उगले यांचे वाहन अडवले. काही समजण्याच्या आतच संशयितांनी उगले यांच्या डोक्यात वजनी वस्तू मारून त्यांना गंभीर जखमी केले.
सव्वा लाखाचा ऐवज लंपास
उगले हे रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना, भामट्यांनी त्यांच्या खिशातील १ लाख २१ हजार ६८० रुपयांची रोकड आणि मोबाईल असा एकूण १ लाख ३१ हजार ६८० रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने ओरबाडून घेतला आणि घटनास्थळावरून पोबारा केला.
पोलिसांकडून वेगाने तपास
या धक्कादायक प्रकारानंतर वावी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा (लूटमार) गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत खबऱ्यांच्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित मच्छींद्र सानप याला भोकणी परिसरातूनच हुडकून काढून अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरोवर करत आहेत.