मोक्का मधील फरार सराईत अखेर जाळ्यात... दोन वर्षांपासून देत होता हुलकावणी...

Share:
Main Image
Last updated: 08-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ जुलै - महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कारवाई झाल्यापासून पोलिसांना सलग दोन वर्षे गुंगारा देणाऱ्या सिडकोतील एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे. अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सोमवारी (दि. ६) सिडको परिसरात सापळा रचून या मोस्ट वाँटेड गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. अक्षय गणपत गावंजे (रा. बाजीप्रभू चौक, सावतानगर, सिडको, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

दोन वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी

अक्षय गावंजे याच्या सिडको आणि अंबड परिसरातील वाढत्या गुन्हेगारी कारवायांना वेसण घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी त्याच्यावर गंभीर स्वरूपाची 'मोक्का' अंतर्गत कारवाई केली होती. मात्र, कारवाईची कुणकुण लागताच तो शहरातून पसार झाला होता. गेल्या दोन वर्षांपासून अंबड पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत होते, मात्र तो वारंवार आपले ठाणे बदलून पोलिसांना हुलकावणी देत होता.

Advertisement

गुप्त माहिती मिळाली आणि जाळे विणले

सोमवारी (दि. ६) सराईत गुन्हेगार अक्षय गावंजे हा गुपचूप आपल्या सावतानगर येथील घरी आला असल्याची खात्रीशीर माहिती अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला (DB) मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करत गावंजे याच्या घराभोवती वेढा दिला. तो पुन्हा पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी झडप घालून त्याला जागीच जेरबंद केले.

अंबड पोलिसांची मोठी कामगिरी

ही यशस्वी कामगिरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, अंमलदार योगेश देसले, उल्हास गांगुर्डे, एखंडे आणि योगेश शिरसाठ आदींच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) डॉ. सचिन बारी करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.