मुंबईतील मालकाला चुना लावून पळणारे भामटे नाशिकमध्ये जेरबंद... सिनेस्टाईल पाठलाग करून आवळल्या मुसक्या...

Share:
Main Image
Last updated: 08-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ जुलै - मुंबईतील आपल्याच मालकाने विश्वासाने दिलेली लाखो रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या दोन अट्टल भामट्यांना नाशिकच्या आडगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. महामार्गावरील नववा मैल भागात गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. संशयितांच्या ताब्यातून ९ लाख रुपयांच्या रोकडसह गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार आणि मोबाईल असा एकूण १६ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राहूल शिवप्रसाद जैसवाल (२८, रा. महाकाली, अंधेरी पूर्व, मुंबई) आणि शिवम सिंह (२६, रा. मिलींदनगर, पवई) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

असा उघडकीस आला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हे मुंबईच्या अंधेरी एमआयडीसी भागात काम करतात. मालकाने नेहमीप्रमाणे विश्वासाने या दोघांकडे अन्य एका व्यापाऱ्याला देण्यासाठी १० लाख रुपयांची रोकड सुपूर्द केली होती. मात्र, संशयित इच्छित स्थळी न पोहोचता ती रक्कम घेऊन पसार झाले. मालकाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दोघांचेही फोन बंद होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मालकाने अंधेरी एमआयडीसी पोलिसांत धाव घेऊन गुन्हा दाखल केला.

कारचा नंबर मिळाला आणि नाशिक पोलीस सतर्क झाले

मुंबई पोलिसांनी या घटनेची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षाला दिली. संशयित आरोपी हे 'एमएच ०३ इजी ८७४३' (MH 03 EG 8743) या क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून नाशिकच्या दिशेने रवाना झाल्याची पक्की माहिती मिळताच नाशिक पोलीस यंत्रणा हायअलर्टवर आली. आडगाव पोलिसांनी तातडीने महामार्गावर आपले खबरे सतर्क केले.

सिनेस्टाईल पाठलाग करून आवळल्या मुसक्या

सोमवारी (दि. ६) सदर संशयित कार आडगाव टी पॉईंट भागात उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तिकडे धाव घेतली, मात्र पोलिसांची चाहूल लागताच भामट्यांनी कार पळवली. आडगावच्या गुन्हे शोध पथकाने हार न मानता महामार्गावर थरारक पाठलाग सुरू ठेवला आणि 'नववा मैल' भागात कार अडवून दोघांच्या मुसक्या आवळल्या.

Advertisement

काय काय झाले जप्त?

रोकड: ८ लाख ९४ हजार ५०० रुपये

वाहन: स्विफ्ट कार

इतर: दोन महागडे मोबाईल

एकूण किंमत: १६ लाख ७८ हजार ५०० रुपये

या पथकाने केली कामगिरी

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख व वरिष्ठ निरीक्षक दिलीप राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निखील बोंडे, सतिश जगदाळे, हवालदार दादासाहेब वाघ, शिवाजी आव्हाड, इम्रान शेख, निलेश काटकर, श्रीकांत महाजन, मनोज परदेशी, अंमलदार सुमित शिंदे, मनोज मोरे, अक्षय गोसावी, प्रितम बोराटे, रविंद्र लिलके आणि निलेश दिवटे यांच्या पथकाने बजावली. पुढील तपासासाठी आरोपींना मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात येणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.