पुणे, (प्रतिनिधी) ७ जुलै - व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या लोहगडावरील धक्कादायक हत्या प्रकरणात दररोज नवे आणि अंगावर काटा आणणारे खुलासे होत आहेत. केतनची वाग्दत्त वधू (फियान्से) मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी ४ महिन्यांपूर्वीच घरच्यांना अंधारात ठेवून गुपचूप लग्न उरकले होते, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या नव्या खुलाशामुळे तपास करणारे पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहेत. दरम्यान, केतनचा काटा काढण्यासाठी या दोघांनी गेल्या ६-७ महिन्यांपासून अनेक क्राईम वेबसीरिज, व्हिडिओ आणि पॉडकास्टचा सखोल अभ्यास केला होता, अशीही माहिती उघड झाली आहे.
शस्त्र वापरल्यास पकडले जाऊ म्हणून कड्यावरून ढकलले!
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी देशातील वेगवेगळ्या मोठ्या गुन्ह्यांची आणि खुनाच्या घटनांची माहिती इंटरनेटवर सर्च केली होती. चाकू किंवा इतर कोणत्याही शस्त्राचा वापर केल्यास पुरावे सहज मिळतात, ते आणण्यासाठी कुठे तरी जावे लागते आणि वस्तू लपवण्याचे आव्हान असते; ज्यामुळे पकडले जाण्याची शक्यता वाढते, असा निष्कर्ष या दोघांनी काढला होता. त्यामुळे कोणताही संशय येऊ नये आणि खुनाचा प्रकार 'अपघात' वाटावा, म्हणून त्यांनी केतनला थेट गडाच्या कड्यावरून ढकलून देण्याचा कट रचला.
१४ जूनचा डाव फसला, १८ जूनला केला घात
पोलीस चौकशीत समोर आलेली गुन्ह्याची साखळी खालीलप्रमाणे आहे:
१४ जून (पहिला प्रयत्न): सिया केतनला मारण्याच्या उद्देशानेच त्याला घेऊन १४ जून रोजी लोहगडावर गेली होती. कड्यावरून ढकलण्याचा तिचा विचार होता, मात्र ऐनवेळी ती घाबरली आणि तिचा डाव फसला.
चेतनला बोलावले: डाव फसल्यानंतर सियाने चेतनला मेसेज केला की, "माझे एकटीचे डेअरिंग होत नाही, तू पण चल. दोघे मिळून ढकलून देऊ."
१८ जून (हत्या): त्यानुसार १८ जून रोजी दोघे केतनला पुन्हा लोहगडावर घेऊन गेले आणि दोघांनी मिळून त्याला दरीत ढकलून दिले. घटनेनंतर हा केवळ एक अपघात असल्याचा बनाव त्यांनी रचला होता.
६ महिन्यांचे चॅटिंग आणि डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती
"आरोपींच्या मोबाईलमधील गेल्या ६ ते ७ महिन्यांपासूनच्या चॅटिंग आणि सर्च हिस्ट्रीची कसून पडताळणी सुरू आहे. सियाने गुगल आणि यूट्यूबवर काय सर्च केले, याचे धक्कादायक तांत्रिक पुरावे हाती आले आहेत. कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन आणि डिजिटल पुरावे यांमुळे तपास आता अगदी निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे."
— तपास अधिकारी, पोलीस विभाग
दोघांनी मृतदेहाचा शोध लागल्यानंतरही पोलिसांची दिशाभूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. मात्र, तांत्रिक विश्लेषणाने त्यांच्या पापाचा घडा फोडला असून, या प्रकरणात आणखी काही मोठे पुरावे आणि आरोपी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.