नाशिकमध्ये चालत्या कारमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका... जीएसटी अप्पर आयुक्तांच्या ड्रायव्हरचा मृत्यू...

Share:
Main Image
Last updated: 07-Jul-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) ७ जुलै - राज्य सेवा व वस्तू कर (GST) विभागाच्या अप्पर आयुक्तांच्या शासकीय वाहन चालकाचा नाशिकमध्ये कार चालवत असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विलास शंकर येळवे (वय ५९, रा. बेलापूर, नवी मुंबई) असे मृत वाहनचालकाचे नाव आहे.

मुंबईकडे परतताना सुटला श्वास

मिळालेल्या माहितीनुसार, विलास येळवे हे वस्तू व सेवा कर विभागाचे अप्पर आयुक्त संजय निकम यांचे वाहनचालक होते. निकम रविवारी (दि. ५) वैयक्तिक कामानिमित्त नाशिक शहरात आले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास काम आटोपून ते एमएच ०१ इव्ही ५५४१ या खाजगी कारने मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास करत होते.

Advertisement

गाडी चालवतानाच आला तीव्र झटका

कार सीबीएसकडून मुंबई नाक्याच्या दिशेने जात असताना, शताब्दी हॉस्पिटल परिसरात अचानक विलास येळवे यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. चालू गाडीतच चालकाची तब्येत बिघडल्याचे पाहून अप्पर आयुक्त निकम यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. त्यांनी येळवे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

मुंबई नाका पोलिसांत नोंद

अप्पर आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चालकाचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.