भावडबारी घाट दोन दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद... 'असा' असेल पर्यायी मार्ग...

Share:
Main Image
Last updated: 07-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) ७ जुलै - जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ (शहादा प्रकाश-विंचूर) वरील भावडबारी घाटात पुढील दोन दिवसांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी येथे दरड कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या आणि पुढील ४८ तासांत येथे पुन्हा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी 'मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११५' अन्वये वाहतूक वळवण्याचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

असा असेल पर्यायी मार्ग 

दिनांक ७ जुलै २०२६ च्या रात्री ००.०० वाजेपासून ते दिनांक ८ जुलै २०२६ च्या रात्री २४.०० वाजेपर्यंत भावडबारी घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या काळात सर्व वाहने खालील पर्यायी मार्गाने सोडण्यात येतील:

देवळा शहरातील पाचकंदील - मालेगाव नाका - पिंपळगाव वाखारी - मेशी फाटा - धोबी घाट - खारी फाटा - देवळा फाटा - मुंबई-आग्रा रोड हायवे मार्गे.

Advertisement

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांना तात्काळ निर्देश

घाटातील दोन्ही बाजूंनी प्रवाशांचा गोंधळ उडू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना तात्काळ वाहतूक दिशादर्शक व चिन्हे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच देवळा पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला या मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हा!

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा आदेश परिस्थितीनुसार शिथिल किंवा बदलण्याचे अधिकार राखीव आहेत. मात्र, सध्याच्या घडीला या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध 'भारतीय न्याय संहिता, २०२३' (BNS) व 'मोटार वाहन अधिनियम, १९८८' च्या प्रचलित तरतुदींनुसार थेट कायदेशीर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.