नाशिक, (प्रतिनिधी) ६ जुलै - 'उन्नत नाशिक अभियान' आणि आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पर्यावरण संवर्धनासाठी 'हरित कुंभ – हरित मॉन्सून' अर्थात 'मिशन ग्रीन मॉन्सून' हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अभियानाच्या दुसऱ्या रविवारी नाशिक शहरात विविध ठिकाणी तब्बल ६ हजार वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली. वाढते तापमान, अल निनोचे संकट आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेता वृक्षारोपण करणे हाच आता एकमेव प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
'मिशन ग्रीन मॉन्सून' अभियानांतर्गत रविवारी नाशिक वनराई आणि म्हसरूळ येथील पिकॉक गार्डन परिसरात २,६०० वृक्षांची लागवड करण्यात आली. ग्रेप काऊंटी येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात महापौर हिमगौरी आडके, आमदार गोकुळ गीते, नगरसेविका दीपाली गीते, रूपाली ननावरे, ग्रेप काउंटीचे किरण चव्हाण, पर्यावरण तज्ज्ञ शेखर गायकवाड, संदीप जाधव यांच्यासह विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
या मोहिमेची माहिती देताना मंत्री महाजन म्हणाले की, "हरित नाशिक हा केवळ शासकीय उपक्रम न राहता प्रत्येक घराघरात पोहोचलेली लोकचळवळ बनली पाहिजे. या अभियानांतर्गत संपूर्ण मोहीम काळात तब्बल १ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. केवळ वृक्ष लागवड करून थांबायचे नाही, तर लावलेल्या प्रत्येक झाडाचे संवर्धन व संगोपन करण्याची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारली पाहिजे, कारण झाडे जगवणे हेच या अभियानाचे खरे यश ठरणार आहे."
२५ ऑक्टोबरपर्यंत दर रविवारी मोहीम!
"नाशिकला पर्यावरणपूरक आणि सुंदर बनवण्यासाठी २८ जून ते २५ ऑक्टोबर २०२६ या पावसाळ्याच्या कालावधीत प्रत्येक रविवारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले योगदान द्यावे."
- गिरीश महाजन, कुंभमेळा मंत्री
या मोहिमेमुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिक शहराचे हरितक्षेत्र (Green Cover) वाढण्यास मोठी मदत होणार असून, प्रशासनाच्या या भूमिकेचे पर्यावरणप्रेमींकडून स्वागत केले जात आहे.