येवल्यात राजकीय भूकंप... एकाचवेळी तब्बल ७ नगरसेवक फुटणार... कुणाला धक्का? कुणाचे बळ वाढणार?

Share:
Main Image
Last updated: 05-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ जुलै - नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. येवला मतदारसंघात आता एका मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली असून, शिवसेनेचे (शिंदे गट) सात नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात सामील होण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. पडद्यामागे या हालचाली वेगाने सुरू असून, यामुळे येवल्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

समीर भुजबळांच्या उपस्थितीत गुप्त बैठक

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत नुकतीच महायुतीच्या नगरसेवकांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेच्या सात नगरसेवकांनी पक्षांतराबाबत सविस्तर चर्चा केल्याचे समजते.

आमदार किशोर दराडे यांना जबर धक्का; 'कार्यशैली'वर नगरसेवक नाराज?

सात नगरसेवक एकाच वेळी राष्ट्रवादीची साथ देण्याच्या तयारीत असल्याने आमदार किशोर दराडे आणि कुणाल दराडे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. संबंधित नगरसेवक हे किशोर दराडे व कुणाल दराडे यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराज असल्याचे बोलले जात आहे. समीर भुजबळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या नगरसेवकांनी आपली खंत आणि नाराजी बोलून दाखविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Advertisement

दराडेंच्या पराभवानंतर शिवसेनेची ताकद घटली?

नुकत्याच पार पडलेल्या नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला, तर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी अनपेक्षित विजय मिळवला. या पराभवानंतर येवल्यात शिवसेनेची (शिंदे गट) पकड सैल होऊ लागल्याचा दावा केला जात आहे. दराडेंच्या पराभवाचाच एक भाग म्हणून आता हे सात नगरसेवक आपली राजकीय दिशा बदलण्याच्या तयारीत आहेत.

"ते महायुती म्हणून आलेत..." : समीर भुजबळ

या सर्व नाट्यमय घडामोडींवर राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "महायुतीचे घटक म्हणून हे नगरसेवक आमच्याकडे आले आहेत. महायुती म्हणूनच आम्ही सर्व एकत्र काम करू." भुजबळांच्या या सावध पण सूचक प्रतिक्रियेमुळे नगरसेवकांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे.

आता या नाट्यमय घडामोडींनंतर नाशिक आणि येवल्याच्या राजकारणाला कोणती नवीन कूस मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.