मुंबई (प्रतिनिधी ) ५ जुलै - बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान (वय ६१) याने सर्व चर्चांना पूर्णविराम देत अखेर गौरी स्प्रॅट यांच्यासोबत ५ जुलै रोजी एका साध्या आणि कौटुंबिक सोहळ्यात लग्नगाठ बांधली. मुंबईतील पाली हिल येथील आमिर खानच्या वैयक्तिक निवासस्थानी हा विवाह सोहळा अत्यंत खाजगी आणि साधेपणाने पार पडला.
हा विवाह 'स्पेशल मॅरेज ॲक्ट'अंतर्गत (विशेष विवाह कायदा) नोंदणीकृत करण्यात आला असून, यावेळी केवळ कुटुंबीय आणि अत्यंत जवळचे मित्र उपस्थित होते. आमिर खान यांनी काही दिवसांपूर्वीच मोठा भपकेबाज समारंभ टाळून घरगुती पद्धतीने नोंदणीकृत (रजिस्टर) विवाह करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पाली हिल येथील त्यांच्या निवासस्थानी आकर्षक रोषणाई करून अगदी मर्यादित स्वरूपात हा सोहळा पार पडला.
पावसाच्या 'रेड अलर्ट'मध्येही सोहळा सुरळीत
मुंबईत सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि प्रशासनाचा 'रेड अलर्ट' असतानाही विवाहाच्या तयारीत कोणताही मोठा अडथळा आला नाही. विवाहाच्या पूर्वसंध्येला आमिरच्या घराबाहेर फर्निचर आणि आवश्यक व्यवस्था करणाऱ्या कर्मचाऱ्यांची लगबग पाहायला मिळाली होती. खराब हवामानाचे सावट असूनही सर्व व्यवस्था चोख आणि सुरळीत पार पडली. या विवाह सोहळ्याला १०० ते १५० निवडक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते.
मुले आणि बहिणीची हजेरी
समारंभ अत्यंत मर्यादित असला तरी कुटुंबातील सदस्यांनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या विशेष क्षणी आमिर खान यांची मुलगी आयरा खान आपल्या पतीसह उपस्थित होती, तर मुलगा जुनैद खान देखील वडिलांच्या या आनंदाच्या प्रसंगाचा साक्षीदार ठरला. याशिवाय आमिर खान यांच्या बहिणीसह इतर जवळचे नातेवाईकही या विवाह सोहळ्यात आवर्जून सहभागी झाले होते.
आमिर खान यांचा हा तिसरा विवाह!
गौरी स्प्रॅट यांच्याशी झालेला हा आमिर खान यांचा तिसरा विवाह आहे. आमिर खान यांच्या वैवाहिक जीवनाचा प्रवास खालीलप्रमाणे राहिला आहे:
१९८६ - रीना दत्ता सोबत विवाह. जुनैद आणि आयरा ही अपत्ये. २००२ मध्ये घटस्फोट (१६ वर्षांनंतर)
२००५ - किरण राव शी लग्न. आझाद हे अपत्य. २०२१ मध्ये परस्पर संमतीने विभक्त.
२०२६ - गौरी स्प्रॅट हिच्याशी ५ जुलै रोजी लग्न
विशेष म्हणजे, दोन्ही घटस्फोतांनंतरही आमिर खान यांचे त्यांच्या दोन्ही माजी पत्नी—रीना दत्ता आणि किरण राव—यांच्यासोबत अत्यंत मैत्रीपूर्ण आणि परस्पर आदराचे संबंध कायम आहेत. अनेक कौटुंबिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते आजही एकत्र दिसत असल्याने बॉलिवूड वर्तुळात या सुसंस्कृतपणाचे कौतुक होत असते. आता आमिर खान यांच्या आयुष्यातील या नवीन इनिंगला चाहत्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात आहेत.