नाशिकच्या रुग्णांना मिळणार मोफत आहार... या ट्रस्टसोबत सरकारचा करार...

Share:
Main Image
Last updated: 04-Jul-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ४ जुलै - राज्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी आणि आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यात क्षयरोगाच्या (टीबी) समूळ उच्चाटनासाठी राज्य सरकार आणि मुंबईच्या प्रसिद्ध 'भन्साळी ट्रस्ट' यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात ही मोहीम आता अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे.

Advertisement

४ तालुक्यांमध्ये कामाला सुरुवात; स्वयंसेवक ठेवणार लक्ष
नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील क्षयरोग निर्मूलनासाठी भन्साळी ट्रस्टने मे २०२६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सटाणा, सुरगाणा, कळवण आणि देवळा या चार तालुक्यांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत ट्रस्टचे क्षेत्रीय स्वयंसेवक थेट क्षय रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत आहेत. रुग्ण नियमित औषधोपचार घेतात की नाही, याची खात्री स्वयंसेवकांद्वारे केली जात आहे.

रुग्णांना प्रोटिन पावडर आणि विशेष काळजी
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना टीबीच्या आजारातून पूर्णपणे बरे होईपर्यंत रोज १०० ग्रॅम पूरक पोषण आहार दिला जात आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने प्रोटिन पावडरचा समावेश आहे. याशिवाय, जे रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेत आहेत, त्यांना आवश्यकतेनुसार तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांची विशेष वैद्यकीय काळजी घेण्याची जबाबदारीही ट्रस्टने उचलली आहे.

"सामाजिक व आर्थिक परिवर्तनामध्ये शासनाची भूमिका महत्त्वाची असली, तरी खासगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाजाचे सहकार्यही तितकेच मोलाचे आहे. भन्साळी ट्रस्टच्या या सहभागामुळे नाशिक जिल्हा क्षयरोगमुक्त होण्यास मोठी मदत होईल."
— देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

'एमडीआर-टीबी'चा धोका होणार कमी
या उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भन्साळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक भन्साळी यांचे विशेष अभिनंदन केले आहे. सुरुवातीच्याच टप्प्यात संशयित रुग्णांची ओळख पटवून त्यांच्यावर उपचार करणे, रुग्णांचे लवकर बरे होण्याचे प्रमाण वाढवणे आणि बहुऔषध-प्रतिरोधक क्षयरोग (MDR-TB) होण्याचा धोका कमी करणे, या दृष्टीने हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्हा आरोग्य विभाग या उपक्रमासाठी भन्साळी ट्रस्टला सर्व आवश्यक ते सहकार्य करत आहे

Advertisement

Comments

No comments yet.