ठकबाज बांधकाम व्यावसायिक जेरबंद... १३ दिवसांपासून होता पसार... असा सापडला घरात...

Share:
Main Image
Last updated: 04-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ४ जुलै - भाडेतत्त्वावर घेतलेल्या लोखंडी सेंट्रिंग प्लेटांचा अपहार करून मूळ मालकाची फसवणूक करणाऱ्या एका ठकबाज बांधकाम व्यावसायिकाच्या नाशिक शहर गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने बेलदारवाडी (म्हसरूळ) परिसरात सापळा रचून ही धडक कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताकडून सुमारे ३ लाख रुपये किमतीच्या २०० सेंट्रिंग प्लेटा हस्तगत करण्यात आल्या असून, त्याला पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अशोक मगन मोहिते (वय ३८, रा. घर नं. १६१७, बेलदारवाडी, म्हसरूळ, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी सेंट्रिंग प्लेटांचा व्यवसाय करणाऱ्या पीडित व्यावसायिकाने इंदिरानगर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली होती.

विश्वासाचा गैरफायदा घेत ५ लाखांचा अपहार

तक्रारदार व्यावसायिक आणि संशयित मोहिते यांची सन २०२५ मध्ये ओळख झाली होती. मोहिते याने आपल्याला बांधकाम व्यवसायासाठी लोखंडी सेंट्रिंग प्लेटांची गरज असल्याचे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. त्यानुसार तक्रारदाराने ६ महिन्यांच्या कालावधीसाठी सुमारे ५ लाख रुपये किमतीच्या ३२५ लोखंडी प्लेटा त्याला भाडेतत्त्वावर दिल्या होत्या. मात्र, ठरलेला कालावधी उलटून गेल्यानंतरही मोहिते याने प्लेटा आणि त्यांचे ठरलेले भाडे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली.

Advertisement

१३ दिवसांपासून होता पसार; घरातून ठोकल्या बेड्या

गुन्ह्याची कुणकुण लागताच संशयित अशोक मोहिते हा गेल्या १२ ते १३ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला होता. पोलीस त्याचा सातत्याने माग काढत होते. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाला संशयित मोहिते हा बेलदारवाडी येथील आपल्या घरी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच पथकाने तातडीने छापेमारी करत त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या गोदामातून ३ लाख रुपये किमतीच्या २०० प्लेटा जप्त करण्यात आल्या असून, उर्वरित प्लेटांचा शोध सुरू आहे.

या पथकाने केली कारवाई:

ही कारवाई नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय सानप, बाळू शेळके, पोलीस जमादार शंकर काळे, हवालदार सुनील आहेर आणि वाल्मिक चव्हाण आदींच्या पथकाने अत्यंत शिताफीने केली.

Advertisement

Comments

No comments yet.