नाशिक, (प्रतिनिधी) ३ जुलै - राज्यात बंदी असलेल्या केंद्रशासित प्रदेश (गोवा) निर्मित विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाला मोठे यश आले आहे. कळवण विभागाच्या भरारी पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडनजीकच्या मंगरूळफाटा भागात सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईत पथकाने एका १० चाकी कंटेनरसह दारूसाठा, असा तब्बल २ कोटी १० लाख ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. युनूस युसूफ पठाण (कंटेनर चालक), जानी इकबाल खान आणि रऊफ लतिफ शेख अशी अटक करण्यात आलेल्या संशयित दारू तस्करांची नावे आहेत.
महामार्गावर रचला सापळा
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर राज्यात बंदी असलेल्या गोवा निर्मित दारूची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती कळवण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने बुधवारी रात्री चांदवडजवळील मंगरूळफाटा आणि गुरुद्वारा परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली.
गुप्त कप्प्यात आढळली 'रॉयल ब्ल्यु व्हिस्की'
संशयास्पदरित्या जाणाऱ्या (NL 01 AF 3538) या क्रमांकाच्या १० चाकी कंटेनरला पथकाने अडवून त्याची कसून झडती घेतली. यावेळी कंटेनरमध्ये गोव्याहून आणलेला आणि राज्यात बंदी असलेला 'रॉयल ब्ल्यु व्हिस्की' नामक मद्याने भरलेल्या खोक्यांचा मोठा साठा आढळून आला. पथकाने तातडीने दारूसाठा आणि कंटेनर जप्त करत चालकासह तिघांना ताब्यात घेतले.
कारवाई करणारे पथक
ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे व मालेगावचे उपअधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली कळवणचे निरीक्षक चंद्रकांत पाटील, दुय्यम निरीक्षक एम. डी. कोंडे, वाय. आर. जोशी, सुनील पवार, अमोल भडांगे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए. व्ही. पाटील, धनराज पवार तसेच जवान संतोष बोर्हाडे, गौरव तारे, विजय पवार, विरसिंग पावरा, गणेश शेवगे, विठ्ठल हाके, योगेश साळवे, राजेंद्र चव्हाणके व वर्षा दळवी यांच्या पथकाने केली. या कारवाईत सटाणा येथील भरारी पथक क्रमांक २ च्या कर्मचाऱ्यांनीही मदत केली.
या कारवाईमुळे आंतरराज्य दारू तस्करांचे धाबे दणाणले असून, या दारूची वाहतूक नेमकी कोठे केली जात होती, याचा पुढील तपास पोलीस आणि एक्साईज विभाग करत आहे.