नाशिक, (प्रतिनिधी) ३ जुलै - शहरातील विविध सोसायट्यांमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर (DVR) चोरून नेणाऱ्या एका सराईत दुकलीला जेरबंद करण्यात पंचवटी पोलीसांना मोठे यश आले आहे. चोरी केलेले डीव्हीआर विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलीसांनी सापळा रचून या भामट्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोपेड आणि ६ लाख ३५ हजार रुपये किमतीचे तब्बल १९ डीव्हीआर जप्त करण्यात आले आहेत. समीर अयुब शहा (वय २५) आणि आसिम नूर खान (वय २३, दोन्ही रा. मेहबूबनगर, वडाळागाव, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्यांची नावे आहेत.
सोसायट्यांचे डीव्हीआर गायब; पोलीस होते सतर्क
पंचवटी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सोसायट्यांमधील सीसीटीव्ही यंत्रणेचे डीव्हीआर चोरून नेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. पुरावाच नष्ट व्हावा यासाठी चोरटे थेट मुख्य डीव्हीआरच पळवून नेत असल्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. गेल्या १५ जून रोजी हनुमानवाडी परिसरात अशीच एक चोरी झाली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोन संशयित मोपेडवरून पसार होत असल्याचे दिसून आले.
'चोरडा लॉन्स' परिसरात लावला सापळा
गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार कैलास शिंदे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, हनुमानवाडीत चोरी करणारे हे दोन चोरटे चोरीचे डीव्हीआर विकण्यासाठी हनुमानवाडी ते चोरडा लॉन्स भागात येणार आहेत. या माहितीच्या आधारे सहाय्यक निरीक्षक सतीश शिरसाठ यांच्या पथकाने तातडीने या परिसरात सापळा रचला आणि संशयित समीर शहा व आसिम खान यांना ताब्यात घेतले.
त्यांची कसून झडती घेतली असता, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली बर्गमॅन मोपेड (MH 15 KL 9882) आणि १९ सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
प्राथमिक चौकशीत संशयितांनी पंचवटी परिसरातील दोन मोठ्या चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्या अटकेमुळे नाशिक शहरातील सीसीटीव्ही चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.
ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सतीश शिरसाठ, हवालदार कैलास शिंदे, अमोल काळे, महेश नांदुर्डीकर, संतोष पवार, जयवंत लोणारे, युवराज गायकवाड, वैभव परदेशी, सचिन बाहिकर, अंमलदार अमोल देशमुख, अंकुश काळे, नितीन पवार, आगोणे, चितळकर, वायकंडे, संतोष पाटील, चारोस्कर, जगताप आणि रोहिणी भोईर यांच्या पथकाने केली.