रस्ता ओलांडताना अपघात झाला... १०० वर्षीय वृद्धा जखमी... उपचारासाठी इतक्या तासांत मुख्यमंत्री निधी मंजूर...

Share:
Main Image
Last updated: 03-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ३ जुलै - गंभीर रस्ता अपघातामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या १०० वर्षीय सरूबाई मुंजवार यांच्यासाठी 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी' खऱ्या अर्थाने देवदूत ठरला आहे. त्यांच्या उपचारासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने कमालीची तत्परता दाखवत अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर केले. या शासकीय मदतीमुळे सरूबाई यांच्यावर आवश्यक ती शस्त्रक्रिया वेळेत पार पडली असून पुढील उपचारांचा मार्ग मोकळा झाला आहे.

रस्ता ओलांडताना झाला होता अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध सरूबाई मुंजवार या रस्ता ओलांडत असताना एका भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या डाव्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्या वयाचा विचार करून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र, या शस्त्रक्रियेसाठी आणि पुढील उपचारांसाठी सुमारे सव्वा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने गरीब मुंजवार कुटुंबासमोर अचानक मोठा आर्थिक पेच निर्माण झाला.

शासकीय यंत्रणेची 'सुपरफास्ट' कामगिरी

आर्थिक विवंचनेत असलेल्या मुंजवार कुटुंबीयांना नातेवाईकांच्या माध्यमातून 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी' योजनेची माहिती मिळाली. त्यानुसार रुग्णालयाच्या व्यवस्थापनाच्या सहकार्याने २५ जून रोजी आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे रीतसर अर्ज सादर करण्यात आला.

Advertisement

अर्ज प्राप्त होताच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने कोणत्याही लालफितीच्या कारभारात वेळ न घालवता, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली. प्रकरणाचे गांभीर्य आणि रुग्णाचे वय लक्षात घेऊन अवघ्या २४ तासांत या मदतनिधीला मंजुरी दिली. यामुळे उपचारात कोणताही खंड न पडता वृद्ध माऊलीवर वेळेत वैद्यकीय उपचार होऊ शकले. या वेळेत मिळालेल्या मदतीबद्दल सरूबाई यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत भावूक होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले आहेत.

परिपूर्ण अर्ज असल्यास अल्पावधीत मदत!

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना उपचारासाठी कमीत कमी वेळेत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सरूबाई यांच्या प्रकरणात कागदपत्रे योग्य असल्याने २४ तासांत मदत देता आली. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज सादर केल्यास विनाविलंब मदत मंजूर केली जाते."

— रामेश्वर नाईक, प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष.

मदत व मार्गदर्शनासाठी येथे संपर्क साधा:

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा लाभ घेण्यासाठी किंवा या योजनेबाबत अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी नागरिकांनी शासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.