मुंबई, (प्रतिनिधी) २ जुलै - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत करण्यात आलेले बदल हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढवणारे नसून, संपूर्ण भरती प्रक्रिया अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी केलेले 'सुसूत्रीकरण' (रिफॉर्म) आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. संगणकाधारित परीक्षा (CBT) प्रणालीमुळे निकालांना गती येईल आणि विद्यार्थ्यांना वर्षातून दोन किंवा अधिक वेळा पूर्व परीक्षा देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र विधान परिषद नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले.
परीक्षा पद्धतीतील 'हे' ३ मोठे बदल:
गट 'क' पूर्व परीक्षा संगणकाधारित: गट ‘क’ संवर्गाची संयुक्त पूर्व परीक्षा आता पूर्णपणे संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेतली जाईल.
वर्षातून दोन किंवा अधिक वेळा संधी: गट ‘अ’, गट ‘ब’ (राजपत्रित) आणि गट ‘क’ संवर्गाच्या पूर्व परीक्षांचे आयोजन वर्षातून दोन किंवा अधिक वेळा केले जाणार आहे. त्यामुळे अपयश आल्यास विद्यार्थ्यांना पुढील संधीसाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागणार नाही.
वैकल्पिक विषय इतिहासजमा: महाराष्ट्र नागरी सेवा गट ‘अ’ आणि ‘ब’ मुख्य परीक्षेतील वैकल्पिक (Optional) विषय २०२७ पासून पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहेत.
ऑफलाइन परीक्षा घेणे आता अशक्य!
परीक्षा पद्धतीत बदल करण्याचे मुख्य कारण स्पष्ट करताना मंत्री शेलार म्हणाले की, ५ मे २०२६ रोजी राज्य शासनाने विविध खात्यांची मोठी नोकरभरती एमपीएससीकडे वर्ग केली आहे. पूर्वी आयोगामार्फत दरवर्षी ६ ते ७ हजार पदांसाठी परीक्षा घेतली जायची, मात्र आता ही संख्या थेट ५० ते ६० हजार पदांवर जाण्याची अपेक्षा आहे. या वाढलेल्या अवाढव्य संख्येमुळे पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने परीक्षांसाठी शाळा-महाविद्यालयांची केंद्र मिळणे कठीण होत असल्याने सीबीटी प्रणाली स्वीकारणे अपरिहार्य ठरले आहे.
गुणांचे सामान्यीकरण (Normalization) पद्धत वैध
मल्टिपल शिफ्टमध्ये परीक्षा होणार असल्याने गुणांच्या सामान्यीकरणाबाबत (Normalization) विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी स्पष्ट केले की, "ही पद्धत सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेली असून त्याच निकषांवर महाराष्ट्रातही ती लागू केली जाईल, ज्यामुळे सर्व उमेदवारांना समान न्याय मिळेल." तसेच, देशातील एसएससी, रेल्वे, बँकिंग (IBPS), कॅट (CAT) आणि इतर ९ राज्यांचे लोकसेवा आयोग याच पद्धतीने यशस्वी परीक्षा घेत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पारदर्शकतेसाठी विशेष उपाययोजना:
सी-डॅक (C-DAC) मार्फत ऑडिट: संगणक परीक्षा केंद्रांचे कडक ऑडिट 'सी-डॅक' या नामांकित संस्थेमार्फत केले जाईल.
प्रोफाइलवर उत्तरपत्रिका: परीक्षा पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला त्याची उत्तरपत्रिका (Response Sheet), उत्तरतालिका (Answer Key) स्वतःच्या प्रोफाइलवर उपलब्ध करून दिली जाईल.
यशाचा पूर्वअनुभव: १ डिसेंबर २०२२ पासून एमपीएससीने १३८ सरळसेवा परीक्षा सीबीटी पद्धतीने यशस्वीरित्या घेतल्या असून, त्याचाच सकारात्मक अनुभव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.