मुंबई, (प्रतिनिधी) २ जुलै - महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीत होणाऱ्या अनियमिततेवर आणि रुग्णालयांच्या मनमानीवर तात्काळ कडक कारवाई करण्यासाठी सरकार विशेष 'फ्लाइंग स्क्वॉड' (भरारी पथक) स्थापन करणार आहे. तसेच, रुग्णांची बेडसाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत, याची थेट मोबाईलवर माहिती देणारा 'रिअल-टाइम बेड उपलब्धता डॅशबोर्ड' विकसित करण्यात येत असल्याची महत्त्वाची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. या लक्षवेधी चर्चेत सदस्य नमिता मुंदडा, बाबासाहेब देशमुख, सुमित वानखेडे, अभिजित पाटील, प्रवीण दटके, हरीश पिंपळे, शेखर निकम, श्वेता महाले आणि राम कदम यांनीही सहभाग घेतला होता.
एकाच मोबाईल नंबरवरून १५,४०७ दावे; नाशिकमध्ये 'एफआयआर'
आरोग्यमंत्र्यांनी सभागृहात एका मोठ्या गैरप्रकाराचा पर्दाफाश केला. १ जुलै २०२४ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एकाच दूरध्वनी क्रमांकाचा वापर करून तब्बल १५ हजार ४०७ दावे नोंदविल्याची गंभीर अनियमितता निदर्शनास आली आहे. हा प्रकार प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील काही रुग्णालयांमध्ये घडला असून, संबंधित रुग्णालयांविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आले आहेत. "या प्रकरणातील दोषी व्यक्ती, संबंधित अधिकारी किंवा इतर कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल," असा इशारा मंत्री आबिटकर यांनी दिला.
१९ रुग्णालये बडतर्फ; १३६ रुग्णालयांना २.३९ कोटींचा दंड
योजनेतील शिस्तभंग आणि फसवणुकीच्या कारवाईची आकडेवारी सांगताना मंत्री आबिटकर म्हणाले की, १ जुलै २०२४ पासून आतापर्यंत:
१९ रुग्णालयांची नोंदणी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
४९ रुग्णालये निलंबित करण्यात आली आहेत.
६६ रुग्णालयांवर रीतसर दावे दाखल करण्यात आले आहेत.
१३६ रुग्णालयांवर एकूण २.३९ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
एआय (AI) प्रणालीने उघड केला घोटाळा!
रुग्णालयांतील गैरप्रकार रोखण्यासाठी 'टीएमएस २.०' (TMS 2.0) ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर (Artificial Intelligence) आधारित अत्याधुनिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे एकाच रुग्णाच्या शस्त्रक्रियेचे वेगवेगळे दावे वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखवल्याचे प्रकार उघडकीस आले असून, संबंधित रुग्णालयांवर 'सुओ-मोटो' (थेट) कारवाई सुरू करण्यात आली आहे.
उपचार पॅकेजेस आणि रुग्णालयांच्या संख्येत मोठी वाढ
योजनेत पारदर्शकता आणतानाच सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा देण्यात आला आहे:
रुग्णालयांची संख्या: पात्रता निकष सुलभ केल्यामुळे योजनेतील रुग्णालयांची संख्या १,७९२ वरून थेट ४,८७९ पर्यंत वाढली आहे.
उपचार पॅकेजेस: आजारांवरील उपचार पॅकेजची संख्या १,३५६ वरून २,३९९ करण्यात आली आहे.
अवयव प्रत्यारोपण: सीजीएचएस (CGHS) च्या निकषांनुसार पॅकेजचे दर वाढवण्यात आले असून, अवयव प्रत्यारोपणासाठी २२ लाख रुपयांपर्यंत कॉर्पस फंडाची तरतूद करण्यात आली आहे.
अतिरिक्त बिलांची मागणी केल्यास होणार हकालपट्टी!
"रुग्णालयांकडून अतिरिक्त बिलांची मागणी, पॅकेजचा भंग किंवा अन्य तक्रारी प्राप्त झाल्यास ऑनलाईनसह जिल्हा समन्वयक व सिव्हिल सर्जन यांच्या माध्यमातून चौकशी करून कडक कारवाई केली जाईल. तसेच, अनेक वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या जिल्हा समन्वयकांच्या बदल्याही तातडीने करण्यात येतील," असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.