मनोहर शिंदे, (नाशिक) १ जुलै - घरमालकांशी गोड बोलून, भाडेकरू म्हणून राहायचे आणि त्यांचा विश्वास संपादन करून ऐन मोक्याच्या वेळी घरावर दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय 'बंटी-बबली' दांपत्याच्या मुसक्या आवळण्यात अंबड गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. नवनीत मधुकर नाईक (वय ४६) आणि स्मिता उर्फ प्रिया नवनीत नाईक (वय ४२, मूळ रा. भांडुप, मुंबई; सध्या रा. बोईसर, जि. पालघर) अशी या हायप्रोफाईल चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणापुढे या जोडप्याची हुशारी फिकी पडली असून, त्यांच्याकडून तब्बल २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
डी-मार्टचे फुटेज आणि आधार कार्ड ठरले टर्निंग पॉईंट
सिडकोतील विजय नगर (माताजी चौक) येथील रहिवासी जयेश नानासाहेब वाकचौरे यांच्या घरात पंकज कदम नावाचा भाडेकरू राहत होता. २३ मे २०२६ रोजी वाकचौरे कुटुंबीय बाहेर गेले असताना, या भाडेकरूने घरमालकाच्या घराचे कुलूप खोलून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी २४ मे रोजी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तपास करत असताना गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी परिसरातील किराणा दुकान आणि डी-मार्टचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात महिला आरोपी संशयास्पदरीत्या कैद झाली. तिच्यावरून जोडप्याचे फोटो मिळवून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. चोरट्यांनी वापरलेले बनावट नाव बाजूला सारत पोलिसांनी थेट त्यांचे खरे आधार कार्ड नंबर शोधून काढले आणि त्यांचे मोबाईल नंबर निष्पन्न केले. तेथून पोलिसांचे पथक थेट बोईसर (जि. पालघर) येथे पोहोचले आणि या दांपत्याला झोपेतच गजाआड केले.
महाराष्ट्रासह कर्नाटकातही गुन्ह्यांचा आलेख
हे दांपत्य केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून आंतरराज्यीय टोळी आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून तब्बल ३० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
नाशिक शहर व ग्रामीण: अंबड व घोटी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीचे गुन्हे उघड.
इतर जिल्हे: मुंबई, ठाणे (तळोजा, उरण), रायगड (पोयनाड, खालापूर), पुणे (भोर, बारामती), अमरावती (बडनेरा), जालना, छत्रपती संभाजीनगर (वाळुंज), कोपरगाव, सांगली (मिरज), सातारा (लोणंद, भुईंज) यांसह पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही गुन्हे दाखल.
परराज्य: कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील के. आर. पुरम पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे.
२४ लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या जोडप्याकडून १६ तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने (ज्याची सध्याची बाजार किंमत २१ लाख ११ हजार रुपये आहे) जप्त केले. तसेच चोरीचे सोने विकून घेतलेला इतर मुद्देमाल, घरझडतीत मिळालेले ८ महागडे मोबाईल, लॅपटॉप असा एकूण २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कामगिरी:
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या सूचनेनुसार अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी (गुन्हे) व शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, जया तरडे तसेच अंमलदार उल्हास गांगुर्डे, सागर जाधव, राकेश पाटील, संभाजी शिंदे, योगेश देसले, सुभाष ठुबे, दीपक निकम, अनिल गाढवे, सचिन करंजे, योगेश शिरसाठ, फरिद इनामदार, तुषार मते, मयूर पवार, वैभव एखंडे, भारती बुट्टे, विशाल साळुंके, विशाल वांजे व गायत्री गोसावी यांनी ही धाडसी कामगिरी केली.
नागरिकांनी आपल्या घरात अनोळखी व्यक्तीला भाडेकरू म्हणून ठेवताना त्यांची संपूर्ण माहिती, आधार कार्ड आणि पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतल्याशिवाय घर देऊ नये, असे आवाहन नाशिक पोलीस प्रशासनाने केले आहे.