सिंहस्थ कामे आणि नाशकातील वाहतूक कोंडी विधिमंडळात गाजली... अखेर राज्य सरकार म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 01-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १ जुलै - नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध यंत्रणांच्या माध्यमातून तब्बल ३४ हजार ७३२.३९ कोटी रुपयांची जय्यत तरतूद करण्यात आली आहे. कुंभमेळ्याची सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असून कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांना सविस्तर प्रकल्प अहवालाअभावी (DPR) प्रशासकीय मंजुरी दिल्याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य पंकज भुजबळ यांनीही सहभाग घेतला. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी शासकीय नियोजनाची सविस्तर माहिती दिली.

'स्वतंत्र डीपीआर'ची गरज नाही

कुंभमेळ्याच्या कामांबाबत स्पष्टीकरण देताना मंत्री सामंत म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीला आवश्यकतेनुसार कामांमध्ये बदल करण्याचे तसेच नवीन कामांचा समावेश करण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे या कामांसाठी स्वतंत्र 'डीपीआर'ची (सविस्तर प्रकल्प अहवाल) आवश्यकता भासणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

रस्ते रुंदीकरण आणि जमीन संपादनाचा वेग वाढला

कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा देताना त्यांनी सांगितले की:

रस्त्यांची कामे: रस्ते रुंदीकरण व नवीन रस्त्यांच्या एकूण ३६ कामांपैकी सुमारे ४० टक्के कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत.

Advertisement

जमीन संपादन: एकूण २५ गावांमधील ४०६.१९ हेक्टर जमीन संपादित करण्याचे नियोजन असून, त्यापैकी ३५.२४ हेक्टर जमीन प्रत्यक्ष संपादित करण्यात आली आहे. या कामासाठी ३५२.५७ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

विशेष तरतूद: खासगी जमीन संपादनासाठी ३,६५९.४७ कोटी रुपये आणि रिंग रोडच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३,९५४ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नियोजन

आगामी ऑक्टोबर महिन्यापासून कुंभमेळ्याच्या प्रारंभिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे सध्या नाशिक शहरात अनेक विकासकामे एकाच वेळी युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांमुळे शहरातील दैनंदिन वाहतुकीत कोणताही अडथळा किंवा कोंडी निर्माण होणार नाही, यासाठी स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या कडक सूचना दिल्या जातील, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.

लोकप्रतिनिधींची लवकरच बैठक

नाशिकमधील नियोजनाबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी केलेल्या सूचनेची दखल घेत, मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, स्थानिक लोकप्रतिनिधींचे प्रश्न आणि सूचना ऐकून घेण्यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून लवकरच एक विशेष बैठक आयोजित केली जाईल.

Advertisement

Comments

No comments yet.