नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ३० जून - देशातील लहान दवाखाने आणि बाह्यरुग्ण सेवा (OPD) देणाऱ्या केंद्रांना डिजिटल प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे ‘eSushrut@Clinic’ (ई-सुश्रुत@क्लिनिक) या रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीचे (HMIS) औपचारिक उद्घाटन करण्यात आले. 'सी-डॅक' (C-DAC) ने विकसित केलेली ही प्रणाली आयुष्मान भारत डिजिटल अभियानाच्या (ABDM) पाठबळावर कार्यरत असणार आहे. सध्या मोठ्या रुग्णालयांमध्ये वापरली जाणारी डिजिटल यंत्रणा अत्यंत महागडी आणि क्लिष्ट असते. या समस्येवर तोडगा म्हणून साधारण आणि मूलभूत स्वरूपाच्या (Lightweight) उपकरणांवरही सहज चालू शकेल अशी ही सोपी आणि सुरक्षित प्रणाली आणण्यात आली आहे.
लहान दवाखान्यांचा संघर्ष संपणार; 'या' सरकारी आणि खाजगी केंद्रांना होणार फायदा
बहुतांश लहान दवाखान्यांना अद्यापही कागदपत्रांचे व्यवस्थापन प्रत्यक्ष हाताने (मॅन्युअली) करावे लागते. या प्रणालीमुळे सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य आणि कल्याण केंद्रे, उपकेंद्रे तसेच खाजगी दवाखान्यांच्या डिजिटायझेशनमधील त्रुटी दूर होणार आहेत. सध्या देशातील ८०० पेक्षा जास्त आरोग्य सुविधा केंद्रे या प्रणालीशी जोडली गेली असून ६८० हून अधिक डिजिटल आरोग्य नोंदी तयार करण्यात आल्या आहेत.
‘eSushrut@Clinic’ ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:
कामकाजाचे स्वयंचलनीकरण (Automation): रुग्ण नोंदणी, बिलिंग, MIS अहवाल आणि 'स्पीच टू टेक्स्ट' (बोललेले टंकित होणे) या सुविधेमुळे डॉक्टरांचे काम सोपे होणार असून चुकांचे प्रमाण कमी होईल.
क्लाउड-आधारित तंत्रज्ञान: ही प्रणाली क्लाउडवर आधारित असल्याने यासाठी कोणत्याही महागड्या कॉम्प्युटर सेटअपची गरज नाही. ती कोणत्याही सामान्य मोबाईल किंवा टॅबवरूनही हाताळता येऊ शकते.
विशिष्ट तांत्रिक कौशल्याची गरज नाही: या प्रणालीची रचना अत्यंत साधी आणि सुलभ आहे, ज्यामुळे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना ती सहज वापरता येईल.
केवळ अधिकृत डॉक्टरांनाच प्रवेश: सुरक्षिततेचा उपाय म्हणून यामध्ये केवळ 'हेल्थ प्रोफेशनल Registry' अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या अधिकृत डॉक्टरांनाच लॉग-इन करता येईल. अनधिकृत व्यक्तींना याचा वापर करता येणार नाही.
आयुष्मान भारत डिजिटल अभियानाशी जोडणी: यामध्ये आभा (ABHA) नोंदींचा शोध घेणे, स्कॅन अँड शेअर आणि वैद्यकीय निर्णय सहाय्यक प्रणाली यांसारख्या अद्ययावत सुविधांचा अंतर्भाव आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) आणि सी-डॅक यांच्यात करार
डिजिटल आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी 'राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण' आणि 'सी-डॅक' यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात येणार आहे. याअंतर्गत सॉफ्टवेअरची देखभाल सी-डॅक करेल, तर रुग्णांना पाठवल्या जाणाऱ्या एसएमएसचा (SMS) खर्च आणि क्लाउड होस्टिंगचा खर्च राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाद्वारे उचलला जाईल. तसेच ग्राहकांच्या मदतीसाठी एनएचए (NHA) द्वारे कॉल सेंटर सेवाही दिली जाईल.
खर्च किती आणि सवलत काय?
सुरुवातीचे ३ महिने मोफत: लहान डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरुवातीचे ३ महिने हे सॉफ्टवेअर पूर्णपणे मोफत दिले जाईल.
अंदाजित मूळ किंमत: ५ वापरकर्त्यांसाठी (Users) प्रति महिना ४९९ रुपये.
सरकारी सवलत: एनएचएच्या करारामुळे यामध्ये २०० रुपयांची सूट मिळणार असून, प्रत्यक्षात डॉक्टरांना दरमहा केवळ २९९ रुपये शुल्क द्यावे लागेल.
५ वापरकर्त्यांपेक्षा जास्त कर्मचारी असल्यास प्रति अतिरिक्त वापरकर्त्यासाठी केवळ ५० रुपये प्रति महिना शुल्क आकारले जाईल.
या किफायतशीर प्रणालीमुळे देशातील आरोग्य व्यवस्था अधिक पारदर्शक, वेगवान आणि कागदविरहित होण्यास मोठी मदत होणार आहे.