मालेगाव, (प्रतिनिधी) ३० जून - मद्यपान करून रस्त्याने मोठ्याने आरडाओरड करणाऱ्या मित्राला 'आरडाओरड करू नकोस' असे सांगणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. "मला शिकवतो का?" असे म्हणत संतप्त झालेल्या मित्राने वाद घालत थेट आपल्याच मित्राला पुलावरून खाली फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार मालेगाव तालुक्यातील अजंग वडेल येथे घडला आहे. या जीवघेण्या हल्ल्यात ३८ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल हिरालाल केदारे (वय ३६, रा. अजंग, ता. मालेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून दीपक अशोक वाघ (वय ३८, रा. आंबेडकरनगर, अजंग) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नेमकी घटना काय घडली?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित राहुल केदारे आणि दीपक वाघ हे दोघे एकमेकांचे मित्र असून त्यांना दारूचे मोठे व्यसन जडले आहे. रविवारी (दि. २८) दुपारच्या सुमारास दोघेही मित्रांनी एकत्र मद्यपान केले होते. मद्यधुंद अवस्थेत दोघेही घराकडे परतत असताना, राहुल केदारे हा रस्त्याने जाताना विनाकारण मोठ्या मोठ्याने ओरडून बोलू लागला. त्यामुळे दीपक वाघ याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि 'रस्त्यात विनाकारण आरडाओरड करू नकोस' असे सांगितले.
वादाचे रुपांतर हातापायी आणि तुंबळ हाणामारीत
दीपकने टोकल्याचा राग राहुलच्या मनात आला. अजंगवडेल पुलावरून जात असताना, "तू मला शिकवतो का?" असे म्हणत राहुलने दीपकसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की संशयित राहुलने दीपकला बेदम शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये थेट हातापायी होऊन पुलावरच तुंबळ हाणामारी सुरू झाली.
ओढत नेत पुलावरून खाली फेकले
या हाणामारीदरम्यान राहुलने दीपकला जबर मारहाण केली, ज्यामुळे दीपक जमिनीवर कोसळला. दीपक जमिनीवर पडताच संतप्त राहुल एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने दीपकला फरफटत ओढत नेले आणि थेट पुलावरून खाली फेकून दिले. पुलावरून खाली पडल्याने दीपकच्या पाठीला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. तो पुलाखाली अत्यंत गंभीर आणि बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
या गंभीर घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून वडनेर खाकुर्डी पोलिसांनी संशयित राहुल केदारेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश नवले करत आहेत.