बँकेतच राडा... वसुली अधिकाऱ्याला उचलून आपटले... हातच केला फ्रॅक्चर...

Share:
Main Image
Last updated: 30-Jun-2026

चांदवड, (प्रतिनिधी) ३० जून - कार्यालयात ग्राहकांसमोर अर्वाच्च (अश्लील) भाषा वापरण्यास मनाई करणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (NDCC) एका विशेष वसुली अधिकाऱ्याला भलतेच महागात पडले आहे. संतप्त झालेल्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने "तुला जीवे ठार मारीन" अशी धमकी देत बँक अधिकाऱ्याला थेट उचलून जमिनीवर आपटल्याची धक्कादायक घटना चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात बँक अधिकाऱ्याचा उजवा हात फॅक्चर (अस्थिभंग) झाला असून याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभाकर गंगाधर सोमवंशी (मूळ रा. राहूड, सध्या रा. डावखरनगर, चांदवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कंत्राटी लिपिकाचे नाव आहे. याप्रकारणी स्वप्निल बाळासाहेब रकिबे (वय ३८, रा. धोडांबे, सध्या रा. गुजरातीनगर, चांदवड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बँकेत नेमकी काय घडली घटना?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्निल रकिबे हे सोग्रस येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. याच शाखेत संशयित आरोपी प्रभाकर सोमवंशी हा कंत्राटी पद्धतीने लिपिक (क्लासरूम क्लर्क) म्हणून काम करतो. गेल्या गुरुवारी (दि. २५) सायंकाळच्या सुमारास रकिबे हे बँकेच्या अन्य कर्मचाऱ्यांसह चहा पिऊन कार्यालयात परतले, तेव्हापासूनच हा वाद सुरू झाला.

रकिबे बँकेत आल्यानंतर संशयित सोमवंशी याने "या भुरट्याने चहा पाजला" असा आक्षेपार्ह शब्दप्रयोग केला. सुरुवातीला रकिबे यांनी बँकेतील शांतता राखण्यासाठी या विधानांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

Advertisement

समज देण्यास गेले अन् अंगावर धावून आला

त्यानंतर काही वेळाने बँकेत ग्राहक उपस्थित असताना, संशयित सोमवंशी हा तिथल्या कॅशिअरशी अत्यंत अर्वाच्च आणि घाणेरड्या भाषेत संवाद साधू लागला. बँकेत ग्राहक असल्याने आणि कार्यालयाची शिस्त बिघडत असल्याने अधिकारी रकिबे हे सोमवंशी याला समजवून सांगण्यासाठी गेले. त्यांनी 'कार्यालयात अशी भाषा वापरू नकोस' असे सांगताच सोमवंशीचा पारा चढला. त्याने रकिबे यांनाच अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तो थेट त्यांच्या अंगावर धावून गेला.

उचलून जमिनीवर आपटले; हात मोडला

वाद इतका विकोपाला गेला की संशयित सोमवंशी याने रकिबे यांना जीवे मारण्याची धमकी देत थेट मारहाण सुरू केली. चिडलेल्या सोमवंशीने रकिबे यांना कंबरेतून घट्ट पकडले आणि थेट उचलून बँकेच्या जमिनीवर जोरात आपटले. या भीषण आघातामुळे रकिबे यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा हात फॅक्चर झाला आहे. या अनपेक्षित हल्ल्यामुळे बँकेतील ग्राहक आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

या धक्कादायक घटनेनंतर शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी वडनेर भैरव पोलिसांनी संशयित प्रभाकर सोमवंशीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बागुल करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.