नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ३० जून - देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत आयुष्मान भारत योजनेचा लाभ सुलभतेने पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते आज ‘आयुष्मान सारथी – पीएम-जेएवाय व्हॉट्सॲप चॅटबॉट’ (Ayushman Sarathi - PM-JAY WhatsApp Chatbot) चे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) विकसित केलेल्या या चॅटबॉटमुळे आता नागरिकांना कोणत्याही सरकारी कार्यालयात किंवा कॉल सेंटरवर अवलंबून न राहता घरबसल्या २४ तास सेवा उपलब्ध होणार आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेशी (AB PM-JAY) संबंधित सेवा अधिक सोप्या, सुरक्षित आणि पारदर्शक होणार असून, लाभार्थ्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत.
व्हॉट्सॲपवर मिळणाऱ्या प्रमुख सेवा:
‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना खालील महत्त्वाच्या सेवांचा डिजिटल लाभ घेता येईल:
पात्रता आणि नवीन अर्ज: योजनेअंतर्गत स्वतःची पात्रता तपासणे आणि नवीन आयुष्मान कार्डसाठी अर्ज करणे.
कार्ड मॅनेजमेंट: आयुष्मान कार्ड डाउनलोड करणे, ई-केवायसी (eKYC) पुन्हा करणे आणि आपले कार्ड सुरक्षितपणे लॉक किंवा अनलॉक करणे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा: ७० वर्षे व त्यावरील नागरिकांसाठी 'आयुष्मान वय वंदना कार्ड' उपलब्ध असणार.
माहिती आणि पारदर्शकता: खात्यावरील शिल्लक रक्कम (वॉलेट बॅलन्स) आणि उपचारांचा इतिहास (ट्रीटमेंट हिस्ट्री) पाहणे.
रुग्णालय शोधणे: उपचारासाठी जवळच्या सूचीबद्ध (इम्पॅनेल्ड) रुग्णालयांची माहिती मिळवणे.
तक्रार निवारण: तक्रार नोंदवणे, तिची स्थिती ट्रॅक करणे आणि आवश्यकता भासल्यास कॉलबॅकची विनंती करणे.
डिजिटल प्रशासनाचे नवे पर्व
या चॅटबॉटच्या उद्घाटनादरम्यान बोलताना केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, "हा चॅटबॉट राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि लाभार्थी यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा ठरेल. याद्वारे रिअल-टाइम (तात्काळ) सेवा मिळणार असून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर डिजिटल माध्यमातून अभिप्राय (फीडबॅक) गोळा केला जाईल, ज्यामुळे आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होईल."
असा करा ‘आयुष्मान सारथी’चा वापर:
या २४x७ उपलब्ध असलेल्या सुरक्षित सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईलवरून +91 72908 23838 या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर "Hi" असा संदेश पाठवायचा आहे, किंवा संबंधित क्यूआर (QR) कोड स्कॅन करून थेट संवाद सुरू करायचा आहे.
या सुविधेमुळे दुर्गम भागातील नागरिकांनाही आरोग्य योजनेशी जोडणे सोपे होणार असून, देशाच्या आरोग्य क्षेत्रात ही एक मोठी डिजिटल क्रांती मानली जात आहे.