त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) २९ जून - त्र्यंबकेश्वर हे केवळ निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळ नसून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सोयीसुविधांचा विकास केला जात आहे. येत्या वर्षभरात या शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल आणि त्र्यंबकेश्वरचा नावलौकिक जगभर होईल, असा विश्वास कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन भव्य मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज दुपारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला, याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
गोदावरी नदी वर्षभर प्रवाही राहणार
मंत्री महाजन पुढे म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी दर्शन पथ, नवीन घाट आणि अंतर्गत रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गोदावरी नदी वर्षभर स्वच्छ आणि प्रवाही राहील, असे चोख नियोजन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे.
अशी असेल राज्यातील पहिली 'हायटेक' प्रशासकीय इमारत:
त्र्यंबकेश्वरमध्ये साकारत असलेली ही इमारत राज्यातील तालुका पातळीवरील पहिलीच एवढी मोठी आणि सर्वसुविधायुक्त इमारत ठरणार आहे.
एकूण खर्च: ₹६१ कोटी ७ लाख (कुंभमेळा विकास प्राधिकरणाकडून ₹४६.५७ कोटी तर ग्रामविकास विभागाकडून ₹१४.५० कोटी मंजूर).
क्षेत्रफळ व मजले: एकूण १० हजार ४०१ चौरस मीटरचे बांधकाम; तळमजल्यासह पाच मजले.
तळमजला: अद्ययावत पार्किंग व्यवस्था.
पहिला मजला: तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. १, पंचायत समिती.
दुसरा मजला: उपकोषगार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. २, उपविभागीय अधिकारी शिबिर कार्यालय.
तिसरा मजला: भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, सामाजिक वनीकरण.
चौथा व पाचवा मजला: कृषी विभाग, भव्य बैठक कक्ष (Meeting Hall) आणि भांडार कार्यालय.
दिग्गजांची उपस्थिती:
या सोहळ्याला महापौर हिमगौरी आडके आहेर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, मुख्याधिकारी गोविंद जाधव आणि तहसीलदार गणेश जाधव (ज्यांनी प्रास्ताविक व आभार मानले) आदी मान्यवर उपस्थित होते.