नाशिक, (प्रतिनिधी) २९ जून - अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नराधमाला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीशांसमोर सरकारी वकील, साक्षीदार आणि तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या भक्कम परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला. योगेश संभाजी साठे (वय ४४ वर्ष, रा. ग्लोबल व्हिजन स्कूलजवळ, इंडोलाईन फर्निचरच्या मागे, अंबड, नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय होती?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा १८ ऑगस्ट २०२३ ते ३० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पीडित मुलीच्या घरात घडला होता. पीडिता ही अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आहे. ती घरात एकटी असताना आरोपी योगेश साठे याने तिला जवळ ओढून तिचा विनयभंग केला होता. तसेच या घटनेबाबत कोणाला काही सांगितले, तर तिला आणि तिच्या आईला मारून टाकण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३५४, ५०६(२) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) २०१२ चे कलम ८ व १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने सुनावलेली शिक्षा
या खटल्याची सुनावणी नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ५ श्री. एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात पार पडली. आज २९ जून २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीला खालील कलमांनुसार दोषी ठरवून शिक्षा सुनावली:
१. भा.दं.वि. कलम ३५४ अन्वये: १ वर्ष सक्त मजुरी व ५०० रुपये दंड.
२. पोक्सो कायदा (कलम ८) अन्वये: ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड.
३. पोक्सो कायदा (कलम १०-१-एन) अन्वये: ५ वर्षे सश्रम कारावास आणि १,००० रुपये दंड.
(सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत.)
तपास अधिकारी आणि वकिलांचे कौतुक
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) जी. ए. मुंगले यांनी केला होता. त्यांनी अत्यंत चिकाटीने तपास करून न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शैलेश सोनावणे यांनी अतिशय प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यांना अभियोग कक्षाचे पो. उपनिरीक्षक सुदाम सांगळे, कोर्ट अंमलदार पो. उपनिरीक्षक सुखदेव माळोदे आणि पैरवी अंमलदार पो. हवालदार रामनाथ आजगे यांनी वेळेवर पुरावे सादर करून मदत केली.
पोलीस आयुक्तांकडून पाठीवर थाप!
गुन्हा शाबीत करून आरोपीला शिक्षा मिळवून दिल्याबद्दल नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) किशोर काळे, सपोआ संदीप मिटके, डॉ. सचिन बारी आणि अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगदेवसिंग राजपूत यांनी संपूर्ण तपास व पैरवी पथकाचे जाहीर अभिनंदन केले आहे.