नाशिक, (प्रतिनिधी) २९ जून - नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरून जाणाऱ्या एकट्या-दुकट्या वाटसरू महिलांना लक्ष्य करून गळ्यातील दागिने ओरबाडणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. निफाड चौफुली परिसरात पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या सखोल चौकशीतून तब्बल १० गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी या कारवाईत ४८ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, गुन्ह्यात वापरलेली यामाहा एफझेड-एस मोटारसायकल आणि मोबाईल फोन असा एकूण ४ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून नाशिक ग्रामीण परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. दुचाकीवरून वेगाने येत महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने चोरून पळ काढणाऱ्या या गुन्हेगारांना पकडण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाण्यांना विशेष गस्त व नाकाबंदीचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निफाड परिसरात समांतर तपास करत असताना पोलीस निरीक्षकांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. विंचूर बाजूकडून नाशिकच्या देशाने दोन संशयित तरुण भरधाव वेगाने मोटारसायकलवर येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचून त्यांचा थरारक पाठलाग केला व निफाड चौफुलीवर त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी व त्यांचे साथीदार:
१) विशाल पोपट सांगळे (वय ३५, रा. अशोकनगर, सातपूर, नाशिक)
२) गणेश उर्फ कुलदीप मनोहर कापसे (वय ४४, रा. अश्वमेध नगर, पेठ रोड, नाशिक)
३) रोहित केशव गायकवाड (वय २थ, रा. भाऊनगर, पिंपळगाव बसवंत) – (चोरीचे दागिने पळवण्यात मदत करणारा साथीदार)
४) विजय पांडुरंग उज्जैनकर (वय ४३, रा. पेठ रोड, नाशिक) – (चोरीचे दागिने विकत घेणारा सोनार/सराफ)
सराफासह ४ जणांना बेड्या, १० गुन्हे उघड
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विशाल सांगळे आणि गणेश कापसे यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार रोहित गायकवाड याच्या मदतीने सायखेडा, निफाड, दिंडोरी, पिंपळगाव, ओझर, वावी आणि लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडल्याची कबुली दिली. तसेच, चोरी केलेले हे सोन्याचे दागिने त्यांनी पेठ रोड येथील आरटीओ ऑफिसजवळ राहणारा सराफ विजय पांडुरंग उज्जैनकर याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवून या दोघांनाही अटक केली आहे. या चौकशीतून खालील प्रमाणे १० गुन्हे उघडकीस आले आहेत:
सायखेडा पोलीस ठाणे: १ गुन्हा
निफाड पोलीस ठाणे: १ गुन्हा
दिंडोरी पोलीस ठाणे: ३ गुन्हे
पिंपळगाव पोलीस ठाणे: २ गुन्हे
ओझर पोलीस ठाणे: १ गुन्हा
वावी पोलीस ठाणे: १ गुन्हा
लासलगाव पोलीस ठाणे: १ गुन्हा
आरोपींवर आधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, प्राणघातक हल्ला, खंडणी, दुखापत आणि फसवणुकीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी विशाल सांगळे याच्यावर सातपूर, गंगापूर, भद्रकाली, सरकारवाडा आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात तब्बल ९ गुन्हे दाखल आहेत, तर गणेश कापसे आणि विजय उज्जैनकर यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. या धडक कारवाईमुळे महिला वर्गातून नाशिक ग्रामीण पोलिसांचे मोठे कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.
सदरची कारवाई ही, नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला एम. यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय शिंदे, सपोनि नितीन रणदिवे, पोउनि सुदर्शन बोडके, पोहवा संदिप कडाळे, बाबासाहेब पवार, हेमंत गरुड, हेमंत गिलबिले, दिपक गुंजाळ, श्रीकांत गारुंगे, ज्ञानेश्वर सानप, चंद्रकांत निर्मळ, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे, मपोहवा ललिता शिरसाठ यांचे पथकाने केली आहे.