६५ फूट खोल कुंडाच्या तळाशी प्रकटले शिवलिंग... त्र्यंबकेश्वर देवस्थानातील 'अमृतकुंडा'चा व्हिडिओ व्हायरल...

Share:
Main Image
Last updated: 29-Jun-2026

त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) २९ जून - आद्य ज्योतिर्लिंग प्रभू श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसरातील ऐतिहासिक 'अमृतकुंडा'च्या तळाशी असलेले प्राचीन शिवलिंग अनेक वर्षांनंतर प्रथमच उघडे झाले असून भाविकांना त्याचे दर्शन घडले आहे. भारतीय पुरातत्व विभागामार्फत (ASI) संवर्धनाच्या कामासाठी कुंडातील संपूर्ण पाणी उपसून स्वच्छता करण्यात आली असता, हा अद्भूत धार्मिक ठेवा समोर आला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अमृतकुंडाचे पाणी उपसले, तळाशी दिसली पिंडी!

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात असलेले ऐतिहासिक 'अमृतकुंड' ६५ फूट खोल आहे. या कुंडातील पवित्र पाणी भगवान त्र्यंबकेश्वराच्या नित्यपूजेसाठी आणि अभिषेकासाठी वापरले जाते. अनेक वर्षांनंतर या कुंडाची स्वच्छता करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. संपूर्ण पाणी उपसून काढल्यानंतर कुंडाच्या अगदी तळाशी असलेल्या छोट्याशा देखण्या शिवलिंगाचे (पिंडीचे) दर्शन झाले. या ऐतिहासिक क्षणी भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी कृष्णमूर्ती व त्यांचे सहकारी, तसेच श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

पेशवेकालीन वास्तुकलेचा अद्भूत नमुना

इतिहासाचा संदर्भ पाहिल्यास, पेशवेकाळात जेव्हा त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, त्याच वेळी या अमृतकुंडाची दगडी बांधणी करण्यात आली होती. अतिशय कलात्मक आणि भव्य पद्धतीने हे कुंड बांधलेले असून, तळाशी जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची रचना करण्यात आली आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी भाविकांना जाण्यास कायमस्वरूपी बंदी असते.

वास्तुशास्त्राचा अनोखा नियम: जितके मंदिर उंच, तितके कुंड खोल!

जुन्या शास्त्रानुसार आणि प्राचीन वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, 'जितके फूट मंदिर उंच, तितकेच फूट खोल तीर्थ (कुंड)' अशी रचना केली जाते. त्र्यंबकेश्वर मंदिराची उंची ६५ फूट आहे, म्हणूनच हे अमृतकुंडही अचूक ६५ फूट खोल बांधण्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात हे कुंड पूर्ण भरते. काही वर्षांनंतर या कुंडाची संपूर्ण स्वच्छता झाल्यामुळे हा अलौकिक सोहळा आणि शिवलिंगाचे दर्शन घडले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.