सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनचं ठरलं... या व्यक्तीशी करणार लग्न... असा आहे पुढचा शाही प्लॅन...

Share:
Main Image
Last updated: 29-Jun-2026

पुणे, (प्रतिनिधी) २९ जून - गेल्या अनेक महिन्यांपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि क्रिकेट जगतात ज्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू होती, त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुप्रसिद्ध संगीतकार-गायक अनिरुद्ध रविचंद्रन आणि आयपीएलमधील 'सनरायझर्स हैदराबाद' (SRH) संघाची लोकप्रिय मालकीण काव्या मारन लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अनिरुद्धचे मामा आणि ज्येष्ठ अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांनी या वृत्ताला दुजोरा देत जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

काय म्हणाले अभिनेते महेंद्रन?

एका प्रसिद्ध वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनिरुद्ध आणि काव्या मारन यांच्या लग्नाविषयी बोलताना वाय. जी. महेंद्रन म्हणाले, "इतके मोठे यश मिळवूनही अनिरुद्ध खूप शांत आहे आणि त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. या आनंदाच्या प्रसंगी मी त्याचे मनापासून अभिनंदन करतो. मला मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध आणि काव्याचे लग्न होणार हे आता निश्चित आहे आणि हा विवाहसोहळा अत्यंत थाटामाटात पार पडेल."

स्पेनमध्ये 'डेस्टिनेशन वेडिंग'ची चर्चा

Advertisement

एक-दोन वर्षांपासून अनिरुद्ध आणि काव्या एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरत होत्या. आता या नात्यावर लग्नाची मोहोर उमटणार असून, हे जोडपं येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघे स्पेनमध्ये अत्यंत शाही पद्धतीने 'डेस्टिनेशन वेडिंग' करणार असून, त्यानंतर चेन्नईमध्ये एका भव्य रिसेप्शनचे (स्नेहभोजन) आयोजन केले जाणार आहे. मात्र, या लग्नाबाबत अद्याप काव्या मारन किंवा अनिरुद्ध यांच्याकडून अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी खास नातं

संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेते रवी राघवेंद्र आणि शास्त्रीय नृत्यांगना लक्ष्मी यांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे, अनिरुद्धचे सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी अत्यंत जवळचे नाते आहे. रजनीकांत यांच्या पत्नी लथा या अनिरुद्धच्या मावशी आहेत, म्हणजेच नातेसंबंधानुसार रजनीकांत हे अनिरुद्धचे काका (मावसा) लागतात.

अनिरुद्धने केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नव्हे, तर रजनीकांत, कमल हासन, ज्युनियर एनटीआर, थलपथी विजय आणि शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर 'जवान' चित्रपटासाठी संगीत देऊन देशभरातील चाहत्यांना भुरळ घातली आहे. आता देशातील सर्वात श्रीमंत बिझनेस वूमन आणि 'क्रश ऑफ आयपीएल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काव्या मारनसोबत तो नवीन इनिंग सुरू करणार असल्याने चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.