येवला, (प्रतिनिधी) २८ जून - येवला शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यामुळे येवला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आले. गेल्या काही दिवसांपासून माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवल्यात मुक्काम ठोकून विविध भागांत कार्यकर्त्यांच्या बैठका, संवाद आणि पक्षप्रवेशाचे कार्यक्रम घेत संघटन विस्तारावर भर दिला आहे.
या प्रवेश सोहळ्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक दयानंद जावळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ज्ञानेश्वर खैरमोडे, भाजपचे कुणाल भावसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे सागर नाईकवाडे यांच्यासह विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले, "येवल्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. हा वाढता जनाधार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांमध्ये निश्चितच पक्षाला मोठे यश मिळवून देईल. येवला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा अधिक जोमाने फडकेल, असा आम्हाला ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
या भव्य पक्षप्रवेशामुळे येवला तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्याने हालचाली सुरू झाल्याचे चित्र असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक आघाडीवर मोठी आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, संभाजी पवार,वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, दत्ता निकम, दीपक लोणारी, मोहन शेलार, देविदास निकम, राजेश भांडगे, निसार लिंबूवाले, ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शहर व तालुका कार्यकारिणीचे सर्व सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.