पावसाळापूर्व पक्षी प्रगणना... नांदूरमध्यमेश्वरमध्ये आढळले एवढे पक्षी...

Share:
Main Image
Last updated: 28-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २८ जून - 'महाराष्ट्राचे भरतपूर' तसेच जागतिक दर्जाचे 'रामसर स्थळ' म्हणून नावलौकिक असलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात आज (दि. २८) पावसाळापूर्व पक्षी प्रगणना अत्यंत उत्साहात पार पडली. या विशेष प्रगणनेमध्ये एकूण ६,२१५ पक्ष्यांची नोंद करण्यात आली असून, यात ६० हून अधिक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी प्रजातींचा समावेश आहे. अभयारण्यातील जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास करणे आणि स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांची अचूक नोंद घेण्याच्या उद्देशाने नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव विभागाच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ७:३० ते ९:३० या वेळेत झालेल्या या प्रगणनेत विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक नागरिक आणि पक्षीमित्रांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

पर्यावरण रक्षणासाठी नाशिक ते अभयारण्य 'सायकल रॅली'

या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेली भव्य सायकल रॅली होय. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीचे नेतृत्व अमित घुगे यांनी केले. रॅलीमध्ये सुमारे ११० सायकलस्वार सहभागी झाले होते. नाशिक ते अभयारण्य या मार्गावर ठिकठिकाणी या सायकलस्वारांनी नागरिकांना प्रदूषणमुक्ती आणि पक्षी संवर्धनाचे आवाहन करत जनजागृती केली.

पक्षी संख्येचे वर्गीकरण

प्रगणनेदरम्यान अभयारण्यात स्थानिक पाणपक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून आला. एकूण नोंद झालेल्या पक्ष्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:

पक्ष्यांचा प्रकार नोंदवलेली संख्या

पाणथळ पक्षी (Waterbirds)४,७७८

Advertisement

झाडांवरील पक्षी (Terrestrial Birds)१,४३७

एकूण पक्षी संख्या६,२१५

प्रमुख प्रजाती: प्रगणनेत प्रामुख्याने चित्रबलाक (Painted Stork), चमचा (Eurasian Spoonbill), हळदीकुंकू बदक, जांभळी पाणकोंबडी, गडवाल, हळद्या, राखी बगळा, सुगरण, उघड्या चोचीचा करकोचा, शेराटी, पांढऱ्या मानेचा करकोचा, लहान पाणकावळा, कपाशी घार, खंड्या, बिटर्न, नदीसुराय, वारकरी (Common Coot) आणि कापशी बदक आदी ६० हून अधिक प्रजाती आढळून आल्या.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियोजन व सक्रिय सहभाग

सदर मोहीम उपवनसंरक्षक (वन्यजीव) कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे व वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली. या मोहिमेत वनपाल कैलास सदगीर, वनरक्षक गोरख पाटील यांच्यासह भीमराव राजोळे, अनंत सरोदे, डॉ. अनिल माळी, प्रा. आनंद बोरा, आदिती शेरे, मिलिंद पेटकर, विजय बर्वे, सचिन पाटील, समीर बोंदार्डे आदी अनेक नामांकित पक्षीमित्र, निसर्ग मार्गदर्शक आणि वनकर्मचाऱ्यांनी माहिती संकलनात मोलाचे योगदान दिले.

"या हंगामातील पक्ष्यांची संख्या आणि प्रजातींची विविधता हे वन विभागाने वर्षभर राबविलेल्या अधिवास संवर्धन व संरक्षण कामाचे यश आहे. नांदूर मध्यमेश्वर येथे आता केवळ हंगामी नव्हे, तर वर्षभर पक्षी दर्शन होत आहे. पक्षीप्रेमींनी अभयारण्याला नक्की भेट द्यावी."

— हिरालाल चौधरी (वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूर मध्यमेश्वर)

Advertisement

Comments

No comments yet.