मुंबई, (प्रतिनिधी) २८ जून - मौल्यवान धातूंच्या बाजारात सध्या मोठी उलथापालथ सुरू असून, जून महिना सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत धक्कादायक ठरला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध शमल्यानंतर किमती वाढतील अशी अपेक्षा असताना, याउलट बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत आतापर्यंतची एका महिन्यातील सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. या दरांच्या भूकंपाने गुंतवणूकदारांचे गणित पूर्णपणे बिघडवले असले, तरी सर्वसामान्य खरेदीदारांसाठी मात्र सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
देशांतर्गत फ्युचर्स बाजार म्हणजेच 'मल्टी कमोडिटी एक्सचेंज' (MCX) वर केवळ एका महिन्यात सोन्याची किंमत तब्बल १७,००० रुपयांनी घसरली असून २९ मे पासून सोन्याचा वायदा दर १०.३६ टक्क्यांनी कमी झाला आहे. चांदीची अवस्था तर त्याहून बिकट असून, चांदीच्या दरात एका महिन्यात तब्बल ५१,००० रुपयांची (१८.५६ टक्के) ऐतिहासिक घट झाली आहे. या प्रचंड घसरणीनंतर बाजारात आता नव्याने गुंतवणूक करायची की नाही, या विचारात गुंतवणूकदार पडले आहेत.
घसरणीमागे नेमकी कारणे काय?
शांतता करार: इराण आणि अमेरिकेने युद्ध थांबवून पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. भू-राजकीय तणाव कमी झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा ओढा कमी झाला.
यूएस फेड रिझर्व्हचे संकेत: युद्ध थांबताच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे नवीन अध्यक्ष केविन वॉर्श यांनी यावर्षी व्याजदर वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले. जागतिक बाजारात व्याजदर वाढणार असल्याने सोन्या-चांदीतील गुंतवणूकदारांनी पैसे काढण्यास सुरुवात केली.
नफावसुली (Profit Booking): सोने-चांदी आधीच उच्चांकी शिखरावर पोहोचल्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफावसुली केली. सुरक्षित मालमत्तेतून पैसा काढून गुंतवणूकदारांनी आता आपला मोर्चा शेअर बाजाराकडे वळवला आहे, ज्यामुळे घसरणीचा जोर वाढला.
जागतिक बाजारातही मोठे नुकसान
जागतिक बाजारात सोन्याची किंमत जानेवारी २०२६ मधील तिच्या सर्वकालीन उच्चांकावरून तब्बल २९ टक्के घसरली असून ती ४,००० डॉलरच्या खाली आली आहे. दुसरीकडे, चांदीच्या किमतीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त मोठी घसरण झाली असून जागतिक दर सुमारे ५७ डॉलरवर खाली आले आहेत. या लक्षणीय घसरणीमुळे बाजारातील तज्ज्ञ आगामी काळात आणखी चढ-उतारांचा अंदाज वर्तवत आहेत.