पोरगं पॅरिसच्या 'आयफेल टॉवर'वर, तर पोरगी वावरात सोयाबीनच्या 'सुडी'वर... काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भावनिक पोस्ट व्हायरल...

Share:
Main Image
Last updated: 28-Jun-2026

नागपूर, (प्रतिनिधी) २८ जून - "एका बाजूला सलग आलेल्या दोन तपांपेक्षा अधिक काळ सातपुड्यातील आदिवासी बांधवांचे दारिद्र्य, उपेक्षा आणि संघर्ष जवळून अनुभवताना त्यांच्याच घरी चटणी-भाकर खाणे; तर दुसऱ्या बाजूला पंचतारांकित हॉटेल्स, विमाने आणि गडगंज श्रीमंत आप्तांचा पाहुणचार स्वीकारणे. पंचपक्वान्न असो की चटणी-भाकर, दोन्ही ठिकाणी मी तितकाच सहज असतो," अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या जीवनाचा एक थक्क करणारा पैलू समाजमाध्यमांवर मांडला आहे. दोन वेगवेगळ्या ध्रुवांवर राहणाऱ्या माणसांशी समसमान प्रेमाचे नाते जोडणाऱ्या सपकाळ यांच्या या अनुभवात नुकतीच एका कौटुंबिक प्रसंगाने मोलाची भर पडली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या मुलांच्या माध्यमातून एकाच वेळी अनुभवायला मिळालेल्या दोन टोकांच्या वास्तवाचे अतिशय बोलके आणि हृदयस्पर्शी वर्णन केले आहे.

स्वतः कमव आणि युरोप फिर; 'डिलिव्हरी बॉय' ते आयफेल टॉवर

सपकाळ यांनी सांगितले की, त्यांचा चिरंजीव यशोवर्धन हा 'ॲग्रो बिझनेस मॅनेजमेंट'चे उच्च शिक्षण घेण्यासाठी नेदरलँडमध्ये गेला आहे. त्याला युरोप पाहण्याचा सल्ला देताना, "फिरण्यासाठी मी पैसे देणार नाही, स्वतः कमव आणि फिर," अशी सक्त ताकीद सपकाळ यांनी दिली होती. वडिलांच्या या शिकवणीला मान देऊन यशोवर्धनने आधी एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये 'डिलिव्हरी बॉय' म्हणून काम केले, त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये आणि आता हाऊसकीपिंगचे काम करून स्वतःच्या पैशाने तो युरोप फिरत आहे.

वैद्यकीय क्षेत्र सांभाळत कन्या गार्गी उतरली शेतात!

तर दुसरीकडे, त्यांची कन्या डॉ. गार्गी ही वैद्यकीय व्यवसायात उमेदवारी करत असून, विविध सामाजिक उपक्रमांतही तिचा सक्रिय सहभाग असतो. यासोबतच, यंदा तिने वडिलोपार्जित शेती स्वतः कसण्याचा विडा उचलला आहे. सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असल्याने शेतात सोयाबीन सोंगणीचा हंगाम अत्यंत घाईघाईत सुरू आहे.

Advertisement

व्हॉट्सॲप कॉलवर दिसले दोन टोकांचे वास्तव!

परवा कुटुंबाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या एका व्हिडिओ कॉलने सपकाळ यांच्यातील 'बाप' भारावून गेला. तो प्रसंग सांगताना ते लिहितात—

"चिरंजीव यशोवर्धन चक्क फ्रान्समधील पॅरिस शहरात स्थित जगप्रसिद्ध 'आयफेल टॉवर'च्या दुसऱ्या मजल्यावरून निसर्गाचा आणि ग्लॅमरचा आनंद घेत होता; तर नेमक्या त्याच वेळी माझी कन्या डॉ. गार्गी ही ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटात हाता-तोंडाशी आलेला घास वाचवण्यासाठी वावरात सोयाबीनची सुडी झाकत होती! एकाच वेळी दोन्ही कोपऱ्यांना हात लावून सुरू असलेली माझ्या मुलांची ही जीवनप्रवास वाखाणण्याजोगी आहे."

मोनालिसाचे चित्र विरूद्ध जीवनाचे जळजळीत वास्तव

एक देश फिरणारा मुलगा पॅरिसच्या म्युझियममध्ये 'मोनालिसा'चे जगप्रसिद्ध पेंटिंग पाहत सौंदर्याचा आस्वाद घेत होता, तर दुसरीकडे मुलगी शेतीच्या बिघडलेल्या चक्रात आणि परतीच्या पावसाच्या अस्मानी संकटात जीवनाच्या जळजळीत वास्तवाचा सामना करत होती. हे सांगताना हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडून 'अजी ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा... An Evening in Paris' हे जुने लोकप्रिय गाणे नकळतपणे बाहेर पडले.

"अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला येऊन ५० वर्षांपेक्षा जास्त काळ साडेसातशे स्क्वेअर फुटाच्या बसक्या घरात राहत असलो, तरी 'अवघे विश्वचि माझे घर' ही अनुभूती मला मिळाली आहे," अशी कृतज्ञता व्यक्त करत मुलांनी जीवनाची ही कोंडी यशस्वीपणे फोडावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.