वैष्णव-शैव आखाड्यांच्या साक्षीने हे महाराज झाले महंत... गोदाघाटावर भव्य शोभायात्रा... रामतीर्थावर रंगला पट्टाभिषेक सोहळा...

Share:
Main Image
Last updated: 27-Jun-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) २७ जून - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिकच्या धार्मिक इतिहासात आणखी एका सुवर्ण अध्यायाची भर पडली आहे. त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील समस्त विरक्त साधू मंडल, नासिक बागलाण मंडल आणि विविध वैष्णव व शैव पंथीय आखाड्यांच्या प्रमुख संत-महंतांच्या उपस्थितीत श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा महंत पदाचा पट्टाभिषेक सोहळा शनिवारी (दि. २७) अभिजित मुहूर्तावर व शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून वेदमूर्तींच्या मंत्रघोषात संपन्न झाला. हजारो नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा रामतीर्थ निरंजन मठ (चित्पावन कार्यालय वेदपाठशाळा) येथे पार पडला.

गोदाघाटावर भव्य शोभायात्रा अन् पूजने

मुख्य सोहळ्यापूर्वी गोदावरी घाटावरून श्री नृसिंह कृपादासजी यांची सहवाद्य, शंखध्वनी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मानाच्या आखाड्यांचे निशाण आणि ध्वजासह आखाडा परिषदेचे महंत, प्रतिनिधी, वृंदावन येथून आलेले विशेष 'इस्कॉन' प्रतिनिधी, भाविक आणि वेदपाठशाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोदाघाटावर निशाण, ध्वज आणि पवित्र गोदामाईचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री हनुमान व श्री एकमुखी दत्त प्रभूंचे दर्शन घेऊन मिरवणूक मुख्य सोहळा स्थळाकडे मार्गस्थ झाली.

पारंपरिक विधी आणि शिंगणे परिवाराचा गौरव

मुख्य सोहळ्याच्या प्रारंभी शास्त्राप्रमाणे गणेश पूजन, पुण्यहवाचन, मातृका पूजन, नंदी श्राद्ध आणि देवता पूजन आदी विधी पार पडले. वैदिक स्मार्त चुडामणी श्री शांताराम भानोसे शास्त्री यांनी पट्टाभिषेक विधी, महंताईची परंपरा, योग्यता आणि श्री नृसिंह कृपादासजी यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. तसेच, ज्या शिंगणे परिवाराने श्री नृसिंह कृपादासजी यांना धर्मकार्यासाठी स्वातंत्र्य दिले, त्यांच्या तीन पिढ्यांचा गौरवशाली इतिहास भाविकांसमोर मांडला. याप्रकरणी संन्यासी धर्म स्वीकारणाऱ्या महंतांच्या मातोश्री देखील या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होत्या.

वैष्णव-शैव पंथांचा अभूतपूर्व सलोखा

कुंभमेळ्याच्या भूमीत शैव आणि वैष्णव आखाड्यांची एकत्रित उपस्थिती हा या सोहळ्याचा सर्वोच्च आणि लक्षवेधी बिंदू ठरला. दोन्ही पंथांच्या मुख्य प्रतिनिधींनी आखाडा परिषदेच्या परंपरागत नियमांनुसार विधी पूर्ण करून श्री नृसिंह कृपादासजी यांच्या महंतपदाची अधिकृत घोषणा केली व तसा लिखित कायदेशीर खलिताही तयार केला.

Advertisement

वारकरी संप्रदायाचे महामंडलेश्वर जगद्गुरु ह.भ.प. लहवीतकर महाराज, रामचंद्र गोस्वामी (नंदिग्राम), श्री गजानन प्रभू, श्री गोविंद प्रभूजी आणि श्री देवेंद्र पंढरी यांनी आशीर्वचन दिले. सोहळ्याचे मार्गदर्शक तथा सिंहस्थ मुख्य प्रवक्ते महंत भक्ती चरणदास महाराज यांनी या मानाचे व आनंदोत्सवाचे महत्त्व विशद केले.

कुंभमेळ्यासाठी महंताईचे महत्त्व अनन्यसाधारण

"आखाडा परिषद आणि महंताईची परंपरा कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असते. नाशिकला लाभलेले हे नवे नेतृत्व आगामी सिंहस्थात मोठी भूमिका बजावेल."

— धनंजय बेळे, स्वागताध्यक्ष

शासकीय प्रतिनिधींची उपस्थिती

या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियुक्त नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा समन्वयक तथा शासकीय प्रतिनिधी रामेश्वर नाईक आणि कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक स्वप्निल नन्नावरे यांची उपस्थिती प्रशासकीय वर्तुळात लक्षवेधी ठरली.

भव्य गोदाआरती आणि महाप्रसाद

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संयोजन स्वागताध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले. त्यांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, वैभव शेमकल्याणी, शिवाजी बोंदार्डे, राजेंद्र फड आणि श्री मदन देवी मुख्य वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. सायंकाळी ५१ गोदासेवकांच्या हस्ते नवनिर्वाचित महंतांच्या उपस्थितीत भव्य 'गोदाआरती' करण्यात आली. सोहळ्यानंतर उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Advertisement

Comments

No comments yet.