नाशिक, (प्रतिनिधी) २७ जून - मुंबई-आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महामार्गावर नादुरुस्त ट्रकची पाहणी करणाऱ्या चालकाला दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी बेदम मारहाण करत लुटल्याची घटना घडली आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या चोरट्यांनी ट्रकच्या कॅबीनमधील लोखंडी रॉडने चालकाच्या डोक्यात प्रहार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास भरत बिन्नर (रा. शहापूर, जि. ठाणे) असे जखमी ट्रकचालकाचे नाव असून त्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
नेमकी घटना काय घडली?
ट्रकचालक विकास बिन्नर हे बुधवारी (दि. २५) आपल्या ताब्यातील ट्रक (क्रमांक: MH 46 AR 1276) घेऊन अंबड एमआयडीसी येथे माल सोडण्यासाठी आले होते. माल खाली करून रात्रीच्या सुमारास ते मुंबई-आग्रा महामार्गाने शहापूरच्या दिशेने परतत होते. रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास तळेगाव शिवारातील ब्रिज ओलांडत असताना, त्यांना ट्रकच्या मागील चाकातून काहीतरी आवाज येत असल्याचे जाणवले.
त्यामुळे त्यांनी महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर आपला ट्रक थांबवला. बिन्नर कॅबीनमधून खाली उतरून पाठीमागील चाकाची पाहणी करत असतानाच, विरुद्ध दिशेने दुचाकीवरून डबलसीट दोन भामटे तिथे आले.
पैसे नाकारताच रॉडने हल्ला!
दुचाकीवरील भामट्यांनी ट्रकचालकाकडे पैशांची मागणी केली. मात्र, बिन्नर यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. याचा राग आल्याने संशयितांनी बिन्नर यांना नाहक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, एका भामट्याने थेट ट्रकच्या कॅबीनमध्ये शिरून तिथला लोखंडी रॉड काढून आणला आणि बिन्नर यांच्या डोक्यात जोराने प्रहार केला.
५ हजारांचा ऐवज लंपास
डोक्यात रॉड लागल्याने चालक विकास बिन्नर हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. ते अर्धवट शुद्धीत असतानाच संशयितांनी बळजबरीने ट्रकच्या केबिनमध्ये प्रवेश केला. तिथून त्यांनी पैशांचे पाकीट आणि मोबाइलचे चार्जर असा एकूण ५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून दुचाकीवरून पळ काढला.
या घटनेमुळे महामार्गावरील चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायधनी करत आहेत.