MPSCचा ऐतिहासिक निर्णय... आगामी सर्व पूर्व परीक्षा आता अशा प्रकारे होणार...

Share:
Main Image
Last updated: 27-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २७ जून - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यातील लाखो उमेदवारांच्या हितासाठी एक अत्यंत मोठा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आयोगाच्या आगामी सर्व पूर्व परीक्षा आता पारंपरिक ओएमआर (OMR) उत्तरपत्रिकेऐवजी 'संगणकाधारित परीक्षा' (Computer Based Test - CBT) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. परीक्षांमधील मोठा विलंब टाळून संपूर्ण भरती प्रक्रिया गतिमान आणि कालबद्ध करण्यासाठी आयोगाने या व्यापक सुधारणा सुरू केल्याची माहिती एमपीएससीचे नवनियुक्त अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. या महत्त्वपूर्ण परिषदेला आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर आणि परीक्षा नियंत्रक सरिता बांदेकर-देशमुख देखील उपस्थित होत्या.

२१ दिवसांत निकाल; स्पर्धा परीक्षार्थींची अनिश्चितता संपणार

अध्यक्ष भीमनवार म्हणाले की, "यापूर्वी परीक्षांचे निकाल आणि पुढील टप्प्यांमध्ये मोठा वेळ जात असल्याने उमेदवारांना मानसिक व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी आयोगाने आता पूर्व परीक्षांचे निकाल अवघ्या २१ दिवसांत जाहीर करण्याचे काटेकोर नियोजन केले आहे." नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल आयोगाने अवघ्या २२ दिवसांत लावून याची यशस्वी प्रचिती दिली असून, यापुढे सर्वच पूर्व परीक्षांचे निकाल २१ दिवसांच्या आतच जाहीर केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

ज्या वर्षी परीक्षा, त्याच वर्षी नियुक्ती!

भरती प्रक्रियेचा कालावधी मर्यादित करण्यासाठी आयोगाने नवे लक्ष्य निश्चित केले आहे:

मुलाखत असलेली पदे: संपूर्ण निवड प्रक्रिया ९ ते ११ महिन्यांत पूर्ण केली जाईल.

Advertisement

केवळ लेखी परीक्षा असलेली पदे: अवघ्या ६ ते ७ महिन्यांत प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांना नियुक्ती मिळेल.

यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरवरील अनिश्चिततेचे सावट दूर होणार आहे.

मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक पद्धतीने!

आयोगाने स्पष्ट केले आहे की, हा सीबीटी (CBT) पद्धतीचा निर्णय केवळ पूर्व परीक्षांसाठीच लागू असेल. राज्यसेवा, गट ‘अ’, गट ‘ब’ किंवा गट ‘क’ च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक आणि सविस्तर वर्णनात्मक/वस्तुनिष्ठ पद्धतीनेच पार पडतील.

सीबीटी आणि 'नॉर्मलायझेशन' पद्धत पूर्णपणे वैज्ञानिक

विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करताना भीमनवार म्हणाले की, सीबीटी आणि नॉर्मलायझेशन (गुण समानीकरण) ही कोणतीही नवी पद्धत नाही. एमपीएससीने आतापर्यंत सुमारे १४० परीक्षा या प्रणालीद्वारे यशस्वीपणे घेतल्या आहेत. ही पद्धत वैज्ञानिक असून याला न्यायालयानेही मान्यता दिली आहे. देशात 'स्टाफ सिलेक्शन कमिशन' (SSC), 'रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड' (RRB), 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' (NTA) आणि महाराष्ट्रातील 'सीईटी सेल' याच पद्धतीने लाखो-कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि सुरक्षितपणे घेत आहेत.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.