दुचाकीवरून गांजा विकणारी सराईत महिला अटकेत... मोपेडच्या डिक्कीत आढळले...

Share:
Main Image
Last updated: 26-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २६ जून - एकीकडे पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असतानाच, दुसरीकडे पंचवटी परिसरात दुचाकीवरून गांजाची विक्री करणाऱ्या एका सराईत महिला तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जुना आडगाव नाका भागात सापळा रचून ही कारवाई केली. संशयित महिलेच्या ताब्यातून १० किलो २१५ ग्रॅम गांजा, दुचाकी, मोबाईल आणि रोकड असा एकूण २ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लता उर्फ ताराबाई सोनू रामचंद्र चौरे (वय ४६, रा. वाल्मिकनगर, पंचवटी, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. या महिलेवर यापूर्वी मुंबईतील वरळी आणि कसारा पोलीस ठाण्यातही गांजा तस्करीप्रकरणी एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

'तपोवन क्रॉसिंग'वर रचला सापळा

पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार विलास चारोस्कर आणि नितीन जगताप यांना जुना आडगाव नाका परिसरातील तपोवन क्रॉसिंग भागात एक महिला दुचाकीवरून गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरुवार, दिनांक २५ रोजी रात्रीच्या सुमारास या भागात सापळा रचला.

Advertisement

मोपेडच्या डिक्कीत आढळला गांजा

संशयास्पदरित्या 'ज्युपिटर' मोपेड दुचाकीवर (क्रमांक एमएच १५ जेटी २५६९) बसलेल्या लता उर्फ ताराबाई चौरे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर महिला पोलिसांच्या उपस्थितीत तिच्या दुचाकीची झडती घेतली असता, मोपेडच्या डिक्कीत तब्बल १० किलो २१५ ग्रॅम गांजासदृश अमली पदार्थ मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची बाजारपेठेत किंमत सुमारे २ लाख १० हजार रुपये आहे.

पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत २ लाख १० हजारांचा गांजा, गांजा विक्रीची रोकड, गुन्ह्यात वापरलेली ७० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि मोबाईल असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.