नाशिक, (प्रतिनिधी) २६ जून - पत्नीच्या आजारपणाच्या उपचारासाठी आणलेली ६ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास करणाऱ्या भामट्या रिक्षाचालकाला आणि त्याच्या साथीदाराला नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. तपासाचा कोणताही ठोस धागादोरा नसताना पोलिसांनी 'डमी प्रवाशां'चा जाळे टाकून या गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी संशयितांकडून ४ लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी मोईन कुरेशी (रा. वडाळा नाका, नाशिक) आणि शैबाज सैय्यद (रा. कथडा, जुने नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांचा तिसरा साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत सौरभ गिरीश आहेर (रा. काठेगल्ली, नाशिक) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पैसे सुट्टे करायला गेले अन् रिक्षाचालक पळाला
फिर्यादी सौरभ आहेर हे गेल्या शनिवारी (दि. २०) पत्नीच्या उपचारासाठी ६ लाख रुपयांची रोकड घेऊन मुंबईहून रेल्वेने नाशिकरोड स्थानकावर परतले होते. रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा स्टँडवर उभे असताना एका अनोळखी रिक्षाचालकाने त्यांना काठेगल्ली येथे सोडण्याची तयारी दर्शवली. आहेर यांनी पैशांची बॅग रिक्षात ठेवली आणि रिक्षाभाडे देण्यासाठी पैसे सुट्टे करण्यासाठी ते शेजारील दुकानावर गेले. आहेर पैसे सुट्टे करत असल्याचे पाहून रिक्षाचालकाने बॅगेसह रिक्षा पळवून नेली.
अशी आखली 'डमी प्रवाशांची' मोहीम
या गंभीर गुन्ह्याची नोंद होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक कामाला लागले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले, मात्र रिक्षाचा स्पष्ट माग लागला नाही. कोणताही पुरावा हाती नसताना पोलिसांनी एक अनोखी युक्ती आखली. पोलिसांनी सलग दोन ते तीन दिवस आपली पथके 'डमी प्रवासी' म्हणून वेगवेगळ्या रिक्षांमध्ये पाठवली आणि संशयित चालकाचा शोध सुरू केला.
या मोहिमेदरम्यान एका रिक्षाचालकाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी (MH 15 JA 5094) या क्रमांकाच्या रिक्षाचा चालक मोईन शेख (कुरेशी) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याचा साथीदार शैबाज सैय्यद याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या.
४ लाखांची रोकड जप्त; तिसरा साथीदार फरार
संशयितांनी चोरलेल्या ६ लाख रुपयांपैकी २ लाख रुपये पुणे येथील एका अनोळखी साथीदार प्रवाशाच्या स्वाधीन केल्याची कबुली दिली आहे. पोलीस आता त्या फरार संशयिताचा शोध घेत आहेत. दरम्यान, पकडण्यात आलेल्या दोन्ही संशयितांकडून पोलिसांनी चोरीतील ४ लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली २ लाख १५ हजार रुपये किमतीची ऑटो रिक्षा, असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकरोड पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.