मनोहर शिंदे, (नाशिक) २६ जून - 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' या जुन्या म्हणीला छेद देणारा आणि प्रशासनातील माणुसकीचे दर्शन घडवणारा एक अनोखा प्रसंग गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे देवळाली येथील एका वृद्ध दाम्पत्याच्या जमिनीचा प्रलंबित प्रश्न अवघ्या काही मिनिटांत, कार्यालयाच्या आवारातील वडाच्या झाडाखालील पारावरच सुटला. प्रशासनाच्या या गतिमानतेमुळे उपस्थित नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
देवळाली येथील भीमाबाई गंभीरचंद सुरंजे आणि त्यांचे पती गंभीरचंद सुरंजे यांच्या मालकीची एक मिळकत (जमीन) आहे. ही जमीन 'भोगवटादार वर्ग-२' मधून 'भोगवटादार वर्ग-१' (क वर्ग सत्तप्रकार) मध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. या कामाच्या पाठपुराव्यासाठी हे वृद्ध दाम्पत्य जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.
जिन्यावर धाप लागली अन् जिल्हाधिकाऱ्यांनी हटकले!
वयोमानामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा जिना चढताना सुरंजे दाम्पत्याला धाप लागली होती. नेमके त्याच वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे जिना उतरत होते. त्यांनी या वृद्ध दांपत्याची आस्थेवाईकपणे चौकशी केली. चौकशीदरम्यान सुरंजे यांचा जमिनीचा विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी सुरंजे यांना वयोमानामुळे वर कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही, असे सांगत आवारातील वडाच्या झाडाखाली असलेल्या पारावर सन्मानाने बसवले.
लॅपटॉपसह निवासी उपजिल्हाधिकारी 'पारा'वर हजर
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वडाच्या पारावरूनच निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना लॅपटॉपसह खाली पारावर येण्याची सूचना केली. आदेश मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत हे देखील तातडीने फाईल आणि लॅपटॉपसह खाली आले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सुरंजे दाम्पत्याच्या प्रस्तावाची माहिती घेऊन त्वरित कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानुसार, जागेवरच सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि नजराणा भरण्यासाठी सुरंजे यांच्याकडे चलनाची प्रत सुपूर्द करण्यात आली. जे काम महिन्यांपासून प्रलंबित होते, ते अवघ्या काही मिनिटांत मार्गी लागले.
"जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. गंभीरचंद सुरंजे हे जिना चढत होते. त्यांची सहज विचारपूस केली व समस्या समजून घेतली. हे काम लगेच होण्यासारखे होते. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांना बोलवून घेत हा विषय मार्गी लावला. हे नियमित प्रशासकीयच काम आहे, त्यात वेगळे असे काहीच केलेले नाही."
— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक
वयोवृद्ध आणि दिव्यांगांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे कामाच्या तत्परतेसाठी ओळखले जातात. दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना पहिल्या मजल्यावरील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणे त्रासदायक ठरते, ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह आवारातील लेखा भवनसाठी तात्काळ लिफ्ट मंजूर केली आहे. या लिफ्टचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच ती नागरिकांसाठी खुली होणार आहे.