गायीच्या मृत्यूचा बनाव... ८० हजारांचा विमा लाटण्याचा प्रयत्न... असे झाले उघड...

Share:
Main Image
Last updated: 26-Jun-2026

नांदगाव, (प्रतिनिधी) २६ जून - गायीचा मृत्यू झाल्याचे खोटे भासवून आणि शासनाचा बनावट शिक्का व कागदपत्रे तयार करून विमा कंपनीची ८० हजार रुपयांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार नांदगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा बनाव उघड झाला असून, याप्रकरणी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास बाबुराव निकुळे (रा. सोयगाव, ता. नांदगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक शंभू चतुर्वेदी (रा. वाघोली, पुणे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

असा उघड झाला बनाव

संशयित रामदास निकुळे याने आपल्या मालकीच्या गायीचा मृत्यू झाल्याचा दावा करत विमा कंपनीकडे ८० हजार रुपयांच्या विम्याची मागणी केली होती. हा दावा खरा दाखवण्यासाठी त्याने पशुवैद्यकीय शवविच्छेदन अहवाल (Post-mortem Report), मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जोडली होती.

Advertisement

विमा मंजूर करण्यापूर्वी कंपनीने नियमानुसार या कागदपत्रांची पडताळणी व खातरजमा केली. तपासणी दरम्यान, हिसवळ (ता. नांदगाव) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नावे सादर करण्यात आलेले अहवाल संशयास्पद आढळले.

सरकारी शिक्क्यांचा गैरवापर

या प्रकरणाबाबत पशुधन विकास अधिकारी अनिल देवकर यांनी सखोल तपासणी केली असता, निकुळे याने सादर केलेली सर्व कागदपत्रे पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. इतकेच नव्हे तर, या कागदपत्रांवर शासकीय शिक्क्यांचा बेकायदेशीर आणि गैरवापर करण्यात आल्याचेही समोर आले. हा फसवणुकीचा अहवाल प्राप्त होताच विमा कंपनीचे व्यवस्थापक चतुर्वेदी यांनी थेट पोलिसांत धाव घेतली.

नांदगाव पोलिसांनी याप्रकरणी संशयित रामदास निकुळे विरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अलगट करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.