नाशिक, (प्रतिनिधी) २५ जून - आडगाव शिवारातील निमसे मळा भागात कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या १० गायींची शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने यशस्वी सुटका केली आहे. या जनावरांना चारा-पाण्याविना क्रूरतेने डांबून ठेवण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी मुख्य संशयितासह एका अल्पवयीन मुलाला (विधीसंघर्षित बालक) ताब्यात घेतले आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व गायींना तपोवनातील कृषी गोसेवा ट्रस्टच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पहाटेच्या सुमारास छापा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमसे मळा येथील कमलवाडी भागात असलेल्या काल्या कुरेशी याच्या गोठ्यात कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी (दि. २३) पहाटेच्या सुमारास पोलिसांनी गोठ्यावर छापा टाकला. त्यावेळी अत्यंत दलिद्दर आणि निर्दयी अवस्थेत, चारा-पाण्याविना कोंडलेल्या १० गायी पोलिसांना आढळून आल्या.
संगमनेर कनेक्शन उघड
या कारवाईत पोलिसांनी गोठा मालक काल्या उर्फ इर्शाद अब्दुल रेहमान कुरेशी (वय ३८, रा. दिंडोरी रोड, नाशिक) याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने ही जनावरे नाझीम शेख आणि नांदूरनाका भागातील एका अल्पवयीन मुलाकडून आणल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत नांदूरनाका परिसरातून संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या जनावरांना संगमनेर येथे कत्तलीसाठी पाठवले जाणार होते, अशी कबुली या मुलाने दिली. या गुन्ह्यातील नाझीम शेख व इतर फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
गुन्हा दाखल व पोलीस पथक
याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना पुढील कारवाईसाठी आडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही धडाकेबाज कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार विशाल काठे, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, संदीप भांड, प्रशांत मरकड, अमोल कोष्टी, मुक्तार शेख व समाधान पवार आदींच्या पथकाने केली.