नाशिक, (प्रतिनिधी) २४ जून - नाशिक शहर व जिल्ह्यात वाढत्या भोंदूगिरीला आणि बुवाबाजीला कायमचा आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात 'दक्षता अधिकाऱ्याची' नेमणूक करावी, तसेच 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची' तातडीने स्थापना करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) वतीने अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांना सादर करण्यात आले. 'अंनिस'च्या कार्यकर्त्यांनी गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात ५ भोंदूबाबांचा भांडाफोड केल्यानंतर ही महत्त्वपूर्ण कायदेशीर मागणी लावून धरली आहे.
कारवाईच्या भीतीने भोंदूगिरी तात्पुरती बंद!
'अंनिस'ने निवेदनात म्हटले आहे की, भोंदू अशोक खरात याच्या अटकेनंतर महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल ५५ भोंदूंवर कायदेशीर गुन्हे दाखल झाले आहेत. जादूटोणाविरोधी कायद्याचा धसका घेतल्यामुळे आणि 'अंनिस'च्या धडक मोहिमांमुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक भोंदू बाबांनी सध्या आपली दुकाने तात्पुरती बंद केली आहेत. मात्र, पुढील काही महिन्यांत परिस्थिती निवळताच हे भोंदू पुन्हा सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधात्मक पावले उचलणे गरजेचे आहे.
धार्मिक स्थळे आणि आश्रमांची खातरजमा करा
जादूटोणाविरोधी कायदा २०१३ मधील कलम ५(१) च्या तरतुदीनुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दक्षता अधिकाऱ्याची नेमणूक केली जावी. या दक्षता अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीतील सर्वधर्मीय धार्मिक स्थळे, मंदिरे, मशिदी, चर्च, विविध आध्यात्मिक आश्रम, मठ आणि संप्रदाय या ठिकाणी कोणतीही अघोरी प्रथा, बुवाबाजी किंवा भोंदूगिरी चालत नाही ना, याची प्रत्यक्ष खातरजमा करावी. तसेच, भविष्यात असे गैरप्रकार घडू नयेत म्हणून संबंधित संशयितांना कायदेशीर नोटिसा बजावाव्यात, जेणेकरून भोंदूगिरीला वेळेतच आळा बसेल.
पोलीस महासंचालनालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा!
विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. छेरिंग दोरजे यांच्या १९ जुलै २०२४ च्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची' स्थापना करणे बंधनकारक आहे. या आदेशाची नाशिक जिल्ह्यात तातडीने कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी द्यावेत, अशी विनंती 'अंनिस'ने केली आहे. या निवेदनावर 'अंनिस'चे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे आणि समर्थ केदारे यांच्या सह्या आहेत.