'तू एकट्यानेच मटणाचे खांड का खाल्ले?' मित्राच्या अंगावर ओतले उकळत्या भाजीचे पातेले...

Share:
Main Image
Last updated: 24-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २४ जून - मित्रांसोबत मटण पार्टी करणे एका ४० वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. मटण शिजत असताना एका मित्राने आधीच भाजीतील मटणाचा तुकडा (खांड) काढून खाल्याने दुसऱ्याचा पराकोटीचा राग अनावर झाला. दारूच्या नशेत दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, एकाने धगधगत्या चुलीवर शिजत असलेल्या उकळत्या मटणाच्या भाजीचे पातेले थेट दुसऱ्याच्या अंगावर ओतले. या अत्यंत धक्कादायक घटनेत एक जण गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भगूर परिसरातील समतावाडी येथे सोमवारी (दि. २२) दुपारी ही घटना घडली.

पॅकमध्ये मटण शिजले अन् वादाची ठिणगी पडली!

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ रमेश साळवे (वय ४०, रा. समतावाडी, भगूर) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमनाथ साळवे आणि रघू नावाचा त्याचा तरुण मित्र, या दोघांनी सोमवारी दुपारी मटण पार्टीचा बेत आखला होता. त्यासाठी मटण आणि दारूची खरेदी करून दोघे साळवे याच्या घरी आले. दुपारच्या सुमारास चूल पेटवून त्यांनी स्वयंपाकाची तयारी केली. दारूचे घोट घेत दोघांनी मटण शिजवले. त्यानंतर चुलीवर मटणाला फोडणी देऊन रस्सा भाजी शिजत ठेवली.

'तू एकट्यानेच खांड का खाल्ले?'

भाजी शिजत असतानाच दारूच्या नशेत असलेल्या सोमनाथ साळवे यांनी पातेल्यातून मटणाचा एक मोठा तुकडा (खांड) काढून खाल्ला. हा प्रकार पाहून रघू चांगलाच भडकला. "तू एकट्यानेच आधी मटणाचे खांड काढून का खाल्ले?" असा जाब विचारत त्याने सोमनाथ यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. नशेमध्ये असलेल्या दोन मित्रांमधील हा वाद पाहता पाहता शिवीगाळ आणि धक्काबुक्कीवर पोहोचला.

Advertisement

चेहरा, छाती आणि पोटाला गंभीर दुखापत

रागाच्या भरात विवेक गमावलेल्या रघूने थेट चुलीवर उकळत असलेले भाजीचे पातेले उचलले आणि सोमनाथ साळवे यांच्या अंगावर ओतले. रघूने थेट डोक्यावरून भाजी ओतल्यामुळे उकळता रस्सा आणि गरम मटण सोमनाथ यांच्या चेहऱ्यासह छाती, पोट आणि हातावर पडले. यामुळे ते गंभीर भाजले. घरात अचानक झालेला आरडाओरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या सोमनाथ यांच्या भावाने व कुटुंबीयांनी घराकडे धाव घेतली. त्यावेळी घरात सर्वत्र मटणाचा सडा पडला होता.

कुटुंबीयांनी गंभीर अवस्थेतील सोमनाथ यांना तातडीने देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये नेले, तिथून पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संशयिताचा शोध सुरू!

"घटनेच्या वेळी दोघेही मित्र दारूच्या नशेत होते. केवळ मटणाच्या तुकड्यावरून झालेला क्षुल्लक वाद टोकाला गेला. उकळता आणि गरम पदार्थ अंगावर ओतणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असून, या प्रकरणी पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. संशयित आरोपी रघू हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे, लवकरच त्याला अटक करण्यात येईल."

— उमेश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देवळाली कॅम्प

Advertisement

Comments

No comments yet.