मालेगाव, (प्रतिनिधी) २४ जून - विहिरीवरून बादलीने पाणी काढत असताना अचानक पाय घसरून खोल पाण्यात पडल्याने ४८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मालेगाव तालुक्यातील नाळे येथे सोमवारी (दि. २२) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संगीता बाळू यादव (वय ४८, रा. नाळे, ता. मालेगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता यादव या सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे घराशेजारील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. विहिरीतून बादलीने पाणी ओढत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या थेट विहिरीत कोसळल्या.
हा प्रकार परिसरातील नागरिक आणि कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली. संगीता यांना पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी तत्काळ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय सूत्रांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
याबाबत पोलीस अंमलदार एस. एस. दराडे यांनी दिलेल्या खबरीवरून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार फुलमाळी पुढील तपास करीत आहेत.