उकाड्यामुळे घराबाहेर झोपणे बेतले जीवावर... माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू...

Share:
Main Image
Last updated: 24-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २४ जून - विषारी सापाने चावा घेतल्याने नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. याप्रकरणी दिंडोरी आणि नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

Advertisement

पहिली घटना: शेतात काम करताना सर्पदंश
दिंडोरी तालुक्यातील नळपाडा येथे पहिली घटना घडली. पुंडलिक विठ्ठल भोये (वय ५१, रा. नळपाडा, ता. दिंडोरी) हे सोमवारी (दि. २२) सकाळच्या सुमारास आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. दरम्यान, अचानक एका विषारी सापाने त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला. त्यांचे भाचे सुदाम ठेपणे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय सूत्रांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी महेंद्र भोये यांनी दिलेल्या खबरीवरून दिंडोरी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार सोनवणे पुढील तपास करीत आहेत.

दुसरी घटना: माहेरी आलेल्या महिलेवर काळाचा घाला
दुसरी घटना नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली. सुश्या लखन सोनवणे (वय ३२, रा. बुरकुलवाडी, मनमाड, ता. नांदगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. सुश्या या पती व मुलांसह पिंपरखेड येथे आपल्या माहेरी आल्या होत्या. रविवारी (दि. २१) रात्री अतिशय उकाडा असल्याने सोनवणे दांपत्य व मुले घराबाहेर मोकळ्या जागेत झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच सुश्या यांच्या हाताला विषारी सापाने चावा घेतला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मृत महिलेचे पती लखन सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस जमादार प्रवीण मोरे तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.