पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे होणार... २० हेक्टर जमिनीस मान्यता...

Share:
Main Image
Last updated: 24-Jun-2026

पुणे, (प्रतिनिधी) २४ जून - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड तसेच इतर अनुषंगिक कार्यालयांच्या उभारणीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ताथवडे (जि. पुणे) येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील २० हेक्टर (सुमारे ५० एकर) जमीन पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतिम मान्यतेनंतर येत्या दोन ते तीन दिवसांत यासंबंधीचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला जाईल, अशी माहिती महसूल मंत्र्यांनी दिली.

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर पुढील पाऊल

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सक्षम पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पोलीस आयुक्तालयाला हक्काच्या जागेची मोठी गरज होती. गृह विभागाने सादर केलेल्या या प्रस्तावास १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ताथवडे येथील 'वळूभाता प्रक्षेत्रा'च्या एकूण ६७ हेक्टर ९४ आर क्षेत्रापैकी २० हेक्टर जमीन पोलीस दलासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दीर्घकालीन गरजा पूर्ण होणार; चिखलीतही मिळाली आहे जागा

Advertisement

सर्वसमावेशक संकूल: ताथवडे येथील या विस्तीर्ण जागेवर आधुनिक पोलीस मुख्यालय, सुसज्ज परेड ग्राऊंड आणि इतर प्रशासकीय कार्यालये उभारली जातील.

चिखली येथील जागा: यापूर्वी हवेली तालुक्यातील मौजे चिखली येथील गट क्रमांक ५३९ पैकी ३ हेक्टर ३९ आर जमीन पोलीस आयुक्त कार्यालय आणि निवासस्थानासाठी ९ जुलै २०२४ रोजी प्रदान करण्यात आली आहे. आता ताथवडे येथील २० हेक्टर जागेच्या मंजुरीमुळे आयुक्तालयाच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण होणार आहेत.

जमीन हस्तांतरणाची ही प्रक्रिया पूर्ण होताच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्वतंत्र व भव्य प्रशासकीय संकुलाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू होईल. या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार महेश लांडगे यांच्यासह महसूल आणि गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.