मुंबई, (प्रतिनिधी) २३ जून - खरीप हंगामाच्या तोंडावर राज्यातील शेतकरी कुटुंबांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' (PM-Kisan) योजनेचा २३ वा हप्ता जाहीर झाला असून, महाराष्ट्रातील तब्बल ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात सुमारे १,८१७ कोटी रुपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून देशभरातील शेतकऱ्यांसाठी या हप्त्याचे वितरण करण्यात आले. मुंबईतून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे (Video Conferencing) सहभागी झाले होते.
खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक आधार
केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ पासून सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न (Aadhaar linked) बँक खात्यात जमा होते.
या प्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,
"पीएम किसान योजना ही बळीराजाला आर्थिक स्थैर्य देणारी महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे. ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हा २३ वा हप्ता वेळेवर वितरित केल्याबद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे महाराष्ट्रातील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो."
महाराष्ट्राला आतापर्यंत ₹४१,००० कोटींहून अधिक लाभ
महाराष्ट्रातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत पार पडलेल्या २२ हप्त्यांद्वारे एकूण ४१,०८३ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. यंदाच्या २३ व्या हप्त्यासाठी भूमी अभिलेख अद्ययावत (Land Records Updating), आधार संलग्न बँक खाते आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेल्या ९०.८५ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला आहे. तसेच या योजनेसाठी आता 'फार्मर आयडी' (Farmer ID) असणे अनिवार्य करण्यात आले होते.
राज्यभरात 'पीएम किसान उत्सव दिवस'
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार २० जून हा दिवस देशभर 'पीएम किसान उत्सव दिवस' म्हणून साजरा करण्यात आला. राज्याचा कृषी विभाग, महसूल व वन विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका कृषी कार्यालये, ग्रामपंचायती आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMC) या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले.
सर्वाधिक लाभार्थी असलेले राज्यातील आघाडीचे ६ जिल्हे:
योजनेचा लाभ मिळवण्यात राज्यातील खालील ६ जिल्हे आघाडीवर राहिले आहेत: