मनोहर शिंदे, (नाशिक) २३ जून - राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत अखेर मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (शिंदे गट) नेते नरेंद्र दराडे यांचा दणदणीत पराभव करत, भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ बबनराव गिते यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या धक्कादायक निकालामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर गोकुळ गिते यांनी अत्यंत आक्रमक आणि भावूक प्रतिक्रिया दिली. "हा विजय नाशिकच्या स्वाभिमानाचा आणि तुमच्या विश्वासाचा आहे," अशा शब्दांत त्यांनी मतदारांचे आभार मानले.
सर्व दबावांना अन् प्रलोभनांना झुगारले!
आपल्या पहिल्याच प्रतिक्रियेत नवनियुक्त आमदार गोकुळ गिते म्हणाले, "गेल्या काही दिवसांत नाशिकच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी झाल्या. निवडणुकीच्या काळात प्रचंड दबावतंत्राचा वापर करण्यात आला. मात्र, सर्व सन्माननीय नगरसेवक बांधवांनी कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनांना बळी न पडता माझ्यावर अढळ विश्वास ठेवला. त्यांनी मला पहिल्या पसंती क्रमांकाचे मत देऊन विजयी केले. एका सामान्य कार्यकर्त्याच्या आणि तुमच्या हक्काच्या माणसाच्या पाठीशी तुम्ही सर्वजण खंबीरपणे उभे राहिलात, हाच विश्वास माझी खरी ताकद आहे."
युवा फळी आणि कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा
या संपूर्ण निवडणुकीत स्थानिक पातळीवर मोठी रसद आणि यंत्रणा गितेंच्या पाठीशी उभी होती. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले, "या अत्यंत चुरशीच्या लढ्यात माझ्या पाठीशी ढाल बनून उभ्या राहिलेल्या नाशिकच्या तमाम युवा फळीला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझा मानाचा मुजरा! तुमच्या अथांग ऊर्जेमुळे आणि निष्ठेमुळेच हे ऐतिहासिक यश आज नाशिकमध्ये साकार झाले आहे."
नगरसेवकांच्या हक्कासाठी आवाज बुलंद ठेवणार
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांवर बोलताना आमदार गिते यांनी शब्द दिला की, "आज या ऐतिहासिक विजयाच्या क्षणी मी नाशिककरांना आणि सर्व नगरसेवकांना शब्द देतो की, नगरसेवकांचा सन्मान राखण्यासाठी आणि त्यांच्या हक्काच्या विकासनिधीसाठी विधानपरिषदेत माझा आवाज नेहमीच बुलंद राहील. हा गोकुळ गिते कालही तुमचा होता, आजही तुमचा आहे आणि उद्याही तुमच्या सेवेसाठी कायम तुमचाच राहील!"
नाशिकच्या राजकारणाला नवी दिशा:
भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या गोकुळ गितेंच्या या विजयाने नाशिकमधील सत्ताधारी महायुतीच्या अंतर्गत समीकरणांना मोठा तडा दिला आहे. शिंदे गटाचे विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांच्या पराभवामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.