नागपूर, (प्रतिनिधी) २३ जून - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच, भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी महायुतीतील इतर पक्षांच्या संभाव्य प्रवेशांवर आणि 'इनकमिंग'वर अत्यंत मोठे आणि सूचक विधान केले आहे. "आमच्याकडे आधीच २३७ आमदार आणि अपक्षांचे बळ असताना अधिक आमदारांची गरज काय?" असा थेट प्रश्न उपस्थित करत देशमुखांनी स्वपक्षीय नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरानंतर आमदार आशिष देशमुख यांनी मांडलेली ही भूमिका महायुतीमधील अंतर्गत अस्वस्थता समोर आणणारी ठरली आहे.
प्रगल्भ लोकशाहीत विरोधी आवाज हवा!
माध्यमांशी बोलताना आमदार आशिष देशमुख यांनी सत्तेच्या केंद्रीकरणावर बोट ठेवले. ते म्हणाले, "सध्याच्या घडीला सभागृहात आमच्याकडे २३७ आमदार आहेत. याशिवाय चार ते पाच अपक्ष आमदारांचाही आम्हाला भक्कम पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत तीन चतुर्थांश इतके प्रचंड बहुमत आमच्याकडे असताना, आणखी नवीन आमदारांना पक्षात घेण्याची गरजच काय? असा प्रश्न माझ्यासारख्या प्रत्येक आमदाराच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. एका प्रगल्भ लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांचा मजबूत आवाज असणे तितकेच आवश्यक आहे."
आमच्या लोकांचे नुकसान नाही का होणार?
पुढील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि उमेदवारीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी कार्यकर्त्यांची चिंता बोलून दाखवली. "बाहेरून जर आणखी आमदार पक्षात येणार असतील, तर पुढच्या निवडणुकीत उमेदवारी कशी द्यायची? हा मोठा पेच निर्माण होईल. यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणाऱ्या आमच्या मूळ पक्षातील निष्ठावंत लोकांचे आणि कार्यकर्त्यांचे राजकीय नुकसान नाही का होणार?" अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
आमदारांनी तिथेच सुखी राहावे, खासदार येत असतील तर स्वागत!
पक्षांतराच्या या लाटेवर टोला लगावताना देशमुख शेवटी म्हणाले की, "माझं स्पष्ट मत आहे की, जो आमदार जिथे आहे, त्याने तिथेच सुखी आणि गुण्यागोविंदाने राहावे. उगाच इकडे-तिकडे उड्या मारण्याची गरज नाही. हो, पण जर कोणी खासदार पक्षात येत असेल, तर त्यांनी मात्र अवश्य यावं, त्यांचे स्वागत आहे."
आशिष देशमुख यांच्या या जाहीर विधानामुळे महायुतीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून आणि नव्या पक्षप्रवेशांवरून जुन्या-नव्या नेत्यांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.